इयत्ता पाचवीत गेल्यावर पहिलीचा विचार का करता?; निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला का?
शिवसेनेची नवरात्रीत नवीन मोहीम सुरू होणार आहे. नवरात्रीत आम्ही दार उघड बया दार उघड ही मोहीम सुरू करणार आहोत. त्यासाठी आज आदित्य ठाकरेंसोबत सर्व महिला नेत्यांची बैठक पार पडली.
अभिजीत पोटे, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, पुणे: शिवसेना-भाजप युतीत आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. पण मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागेल म्हणून शिवसेनेने (shivsena) घेतलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केला. शिंदे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या विधानावर शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या पक्षात एक शिस्त आहे. त्यावेळी काय चर्चा झाली हे उद्धव ठाकरेच सांगतील. पण तुम्ही आता मुख्यमंत्री आहात. राज्याचा कारभार पाहत आहात. तुम्ही इयत्ता पाचवीत गेल्यावर इयत्ता पहिलीचा विचार का करता? असा खोचक सवाल निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच तुमच्याकडे जे काम आहे. ते चांगलं करा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
निलम गोऱ्हे या मीडियाशी संवाद साधत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते त्यांचे मंत्री जे बोलत आहेत, त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्यांचं काम संपलं की ते या सगळ्यांना एक एक पाऊल मागे घेत यांची अवहेलना करतील. खरं तर ती अवहेलना आतापासूनच सुरू झाली आहे, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
शिवसेनेला शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर खुशाल जाऊ द्या. आम्ही आमची बाजू सातत्याने आणि नियमाने मांडू. यात सगळ्यात मोठा साक्षीदार ईश्वर आहे, तो सगळं पाहत आहे. त्यामुळे आपण जे बोलतोय, जे करतोय ते बरोबर आहे का? त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं, असा पलटवार त्यांनी केला.
शिवसेनेची नवरात्रीत नवीन मोहीम सुरू होणार आहे. नवरात्रीत आम्ही दार उघड बया दार उघड ही मोहीम सुरू करणार आहोत. त्यासाठी आज आदित्य ठाकरेंसोबत सर्व महिला नेत्यांची बैठक पार पडली. आम्ही सर्व महिला कार्यकर्त्या नवरात्रीत शक्तीपीठांना जाणार आहोत. आदिशक्तीला शक्ती कायदा लागू व्हावा ही प्रार्थना करू. राज्यात कायदा व सुव्यवस्था नांदण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करू, असं त्यांनी सांगितलं.
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पोलिसांकडे जे पुरावे येतील, पोलीस तशी कारवाई करतील. तपासावरून लक्ष उडावं म्हणून पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मूळ विषयावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी अतिशय चुकीचे कृत्य केले आहे. जे झालं ते सगळं समोर यावं, अशी मागणी त्यांनी केली.
आदित्य ठाकरे मराठी मुलांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आदित्य यांच्यावर टीका म्हणजे हे लोकांच्या डोळ्यात धुराळा उडवण्याचा प्रकार आहे. देशात 75 टक्के विरोधकांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा फक्त एक हाती कार्यक्रम चालू आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचा. शिवसेनेवर जनतेचे मोठ प्रेम आहे, असंही त्या म्हणाल्या.