ना दादा, ना ताई, अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच!; दिवसभरात काय काय घडलं?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात शरद पवार यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं. त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप झाला. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना गळ घातली. कार्यकर्त्यांनी तर आक्रोशही करून पाहिला. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे आता काय? असा सवाल केला गेला. त्यातच कुणी तरी दिल्लीत ताई, राज्यात दादा असा फॉर्म्युला सूचवला. तर कुणी तरी सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास त्याचं स्वागतच करू असं सांगितलं. त्यामुळे अजितदादा अध्यक्ष होणार की सुप्रिया सुळे? अशी चर्चा सुरू होती. निवड समितीतीही या दोघांच्या नावावर चर्चा होणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात उलटच झालं. ना दादा, ना ताई… शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहतील असा ठरावच निवड समितीने केला. निवड समितीचा हा निर्णय म्हणजे अजितदादांसाठी मोठा चेकमेट असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार होती. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आजच्या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रदेश कार्यालयाबाहेर जमले होते. या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणा दिल्या. जो नेता बैठकीसाठी येईल त्याला घेरून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. एका कार्यकर्त्याने तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समितीवर आपसूक दबाव आला.
सर्व अंदाज फोल
त्यानंतर बरोबर 11 वाजता प्रदेश कार्यालयात बैठक सुरू झाली. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनाच अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मांडला जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल अशी शक्यता होती.
तसेच पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे अध्यक्ष किंवा सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद देण्याचा ठराव मांडला जाईल असंही सांगितलं जात होतं. काहींनी तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून त्यांच्याकडे देशाची जबाबदारी द्यायची आणि अजित पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी द्यायची असा निर्णय होईल असा कयास वर्तवला होता. काहींच्या अंदाजानुसार अजित पवार यांनाच अध्यक्ष करण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात उलटं घडलं.
फक्त अर्ध्या तासात निर्णय
बैठक सुरू झाल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. एक म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करणे आणि दुसरा म्हणजे शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम ठेवणे. हे दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर या बैठकीत इतर कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही. वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना भेटून हा निर्णय कळवण्याचं ठरलं. अवघ्या अर्ध्या तासात समितीने निर्णय घेतला.
या निर्णयामुळे अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदाचं स्वप्न भंगलं. अर्ध्या तासात बैठक आटोपताच पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, पीसी चाको, भुजबळ, तटकरे, खडसे, जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी निघून गेले.