Arjun Khotkar | अर्जुन खोतकरांच्या चेहऱ्यावर तणाव का? ईडी की आणखी काही? उत्तरासाठी हा Video पहा
अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत असताना तर आपण एकनाथ शिंदे गटात जाण्याची घोषणा केलेली नाही. मात्र जालन्यात गेल्यावर आपण स्पष्ट बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईः जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलंय. अर्जुन खोतकरांनी अद्याप याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यलयातून त्या आशयाचं पत्र आलेलं आहे. खोतकारांना शिंदे गटात येण्यासाठी दबाव टाकला जातोय का? काही अमिषं दाखवली जातायत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. जालन्यातल्या रामनगर साखर कारखाना (Jalna Sugar Factory) खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी धाडही टाकली होती. या कारखान्याच्या लिलावत घोटाळा झाल्याचे ईडीला आढळून आले होते. आता या फायली बंद करण्यासाठी एकनाथ शिंदे गटात शामिल होण्याचा दबाव खोतकरांवर टाकला जातोय का, असा सवाल दबक्या आवाजात विचारला जातोय. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकरांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव जाणवतोय. दिल्लीतले टीव्ही9 च्या प्रतिनिधींनीही अर्जुन खोतकर यांना हाच सवाल केला. तेव्हा एखाद्याचा परिवार अडचणीत असेल तर त्या परिवाराच्या वेदना काय आहेत, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, असं स्पष्ट उत्तर अर्जुन खोतकर यांनी दिलं. ईडीच्या ससेमिऱ्यामुळे तुम्ही निर्णय घेताय का.. असा प्रश्न विचारल्यावर काहीही न बोलता ते थेट गाडीत बसणे पसंत केले.
अर्जुन खोतकर काय म्हणाले?
नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात असून त्यांच्या काही बैठकादेखील झाल्या. खोतकर आता शिंदे गटात जाणार असल्याचं जाहीर करतील, अशा चर्चांना उधाण आलंय. मात्र त्यांनी अद्याप ते स्पष्ट केलेलं नाही. पण मी तणावाखाली आहे, तुम्ही समजून घ्या. माझ्या वर्तणुकीवरून मी शिंदे गटात जाणार की नाही, हे तुम्हाला स्पष्ट होईल, असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं..
मतदार संघाची चर्चा उगाच?
अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार यावर पुढील काही दिवसात शिक्कामोर्तब होईलच. पण खोतकर कोणत्या मुद्द्यासाठी शिंदे गटात जाणार, यावर चर्चा सुरु आहेत. यातच रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न दिल्लीत केले गेले. जालना लोकसभा मतदार संघाची जागा मला मिळाली तर काही उपयोग होईल, असंही वक्तव्य खोतकरांनी केलं. यावर रावसाहेब दानवेंनी तर स्पष्ट नकार दिला. पाच टर्मपासूनचा हा मतदारसंघ रावसाहेब दानवे सोडणार नाहीतच. दूरदूर पर्यंत याची शक्यताही नाही. मग ईडीच्या दाबावाचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासाठी ही चर्चा सुरु करण्यात आली का, असाही सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
जालन्याला गेल्यावर घोषणा?
अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत असताना तर आपण एकनाथ शिंदे गटात जाण्याची घोषणा केलेली नाही. मात्र जालन्यात गेल्यावर आपण स्पष्ट बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र आजच्या प्रतिक्रियांमध्ये त्यांनी मी तणावाखाली असल्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्यातून बरेच अर्थबोध घेता येतील.