विखे-पाटलांची नात पुन्हा स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी
स्टॉकहोम (स्वीडन) : सहकारमहर्षी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील या नात नीला विखे पाटील पुन्हा एकदा स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी विराजमान झाल्या आहेत. गेल्या महिन्यातच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आणि ग्रीन पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते स्टीफन लोफवन यांनी स्वीडनच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली. नवनिर्वाचित पंतप्रधान स्टीफन लोफवन यांच्या सल्लागारपदी पुन्हा नीला विखे पाटील यांचीच निवड करण्यात आली […]
स्टॉकहोम (स्वीडन) : सहकारमहर्षी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील या नात नीला विखे पाटील पुन्हा एकदा स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी विराजमान झाल्या आहेत. गेल्या महिन्यातच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आणि ग्रीन पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते स्टीफन लोफवन यांनी स्वीडनच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली. नवनिर्वाचित पंतप्रधान स्टीफन लोफवन यांच्या सल्लागारपदी पुन्हा नीला विखे पाटील यांचीच निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2016 च्या जानेवारी महिन्यात पहिल्यांदा नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळीही स्टीफन लोफवन हेच स्वीडनचे पंतप्रधान होते.
नीला विखे पाटील या स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयातील अर्थ विभागाच्या सल्लागार असतील. तसेच, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार इत्यादी विभागांची महत्त्वाची जबाबदारी नीला यांच्यावर असेल, अशी माहिती नीला यांचे वडील अशोक विखे पाटील यांनी दिली.
कोण आहेत नीला विखे पाटील?
नीला या काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री ‘सहकारमहर्षी’ दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात आहेत. बाळासाहेब विखे पाटलांचे सुपुत्र अशोक विखे पाटील हे नीला यांचे वडील. म्हणजेच, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी.
नीला विखे पाटील यांचे वडील म्हणजेच अशोक विखे पाटील हे विखे पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. विखे पाटील फाऊंडेशन महाराष्ट्रात 102 शिक्षणसंस्था चालवते.
स्वीडनमध्ये जन्म, नगरमध्ये बालपण, स्पेनमध्ये शिक्षण
नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला. त्यानंतर काही काळ त्या अहमदनगर येथे वास्तव्यास होत्या. नीला यांचं बालपण नगरमध्येच गेलं. नीला या आता 32 वर्षांच्या असून, त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याच्या पदवीचं शिक्षण घेतलं आहे. तसेच, स्पेनमधील माद्रीद विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. आर्थिक व्यवस्थापन, लेखा, व्यापार कायदा इत्यादी विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही घेतलं आहे.
नीला विखे पाटील या ग्रीन पार्टीच्याही सदस्या आहेत. ही ग्रीन पार्टी विद्यमान पंतप्रधान स्टीफन लोफवन यांच्या पक्षाचा मित्रपक्ष आहे. नीला या स्वीडनमधील विविध संघटनांमध्ये कार्यरत आहेत.