Nitesh Rane Arrest : भाजप नितेश राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे का? मुनगंटीवार म्हणतात, वेट एन्ड वॉच!
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप नितेश राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार राणेंबाबत सूडबुद्धीने वागत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा झटका बसलाय. कारण, कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना 2 दिवसांची अर्थात 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. कोर्टानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कणकवली पोलिस नितेश राणे यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर नितेश राणे यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप नितेश राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार राणेंबाबत सूडबुद्धीने वागत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राणेंच्या बाबतीत सरकारनं सूडबुद्धीनं वागू नये. एखादा व्यक्ती जर दोष सिद्ध करण्याइतका गंभीर दिसत असेल, तर त्याच्यावर कारवाई करावी. छगन भुजबळांनंतर जे सुडाच्या भावनेनं कारवाईचं सत्र सुरु झालं, तसं होऊ नये. दोन्ही बाजूने युक्तीवाद होईल, पोलिस चौकशी होईल ‘वेट एन्ड वॉच…’ निरपराध माणसाच्या पाठीशी भाजप नेहमीच उभी रहाते, मग तो पक्षाचा असो की नसो. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिलीय.
कोर्टाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
नितेश राणे दुपारी दिवाणी न्यायालयासमोर शरण गेल्यानंतर यांच्या वकिलांकडून जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरु होतं. तेव्हा सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? असा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची अर्थात 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कणकवली पोलीस नितेश राणेंना घेऊन पोलीस ठाण्यात गेले.
नितेश राणेंचे वकील काय म्हणाले?
नितेश राणेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांचे वकील म्हणाले की, न्यायालयानं आमच्या सरेंडरचं अप्लीकेशन मान्य केलं. त्यानंतर आम्हाला न्यायालयीन कस्टडीत घेतलं. आम्ही सर्वांनी मिळून युक्तिवाद केला. पोलिसांनी 10 दिवसांची कोठडी मागवली होती. पण युक्तीवादात सांगितलं की पाच दिवस नितेश राणेंनी चौकशीला सहकार्य केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सर्व आरोपींना एकत्र बसून चौकशी करण्याची पोलिसांची मागणी आहे. न्यायालयीन आरोपी आणि पोलीस कोठडीतल्या आरोपींची एकत्र चौकशी पोलिसांना करायची होती, पण तसं करता येत नाही. पोलीस चौकशीला सामोरं जाऊ, दोन दिवसांनी जामीनासाठी अर्ज देऊ. आम्ही पोलीस कोठडी कमी द्या, जास्त द्या, यावर आम्ही काहीही म्हटलेलं नाही, असं राणेंच्या वकिलांनी सांगितलं.
इतर बातम्या :