बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी टि्वट करत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी टि्वट करत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र इथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे.
काय आहे व्यंगचित्र?
या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
अमरावती हिंसाचारावरूनही महाविकास आघाडीवर टीका
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेनंतर अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यावरून देखील राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा जनतेच्या नशिबात आघाडीची सजा #BJPMaharashtra #Penguin pic.twitter.com/mYr8SL7pXT
— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2021
संबंधित बातम्या