सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणात (Attack on Santosh Parab) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे यांचा आजार राजकीय असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला नितेश राणे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना प्रत्यु्त्तर देताना नितेश राणे यांनी आपल्या आरोग्याची (health) कुंडलीच मांडली आहे. मी जरी कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मला आजही त्रास होतोय. त्यामुळे मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मला पाठिच्या मनक्याचा त्रास होत आहे. माझी शुगर लो आहे. मात्र तरीही काही जण म्हणतात की माझा आजार हा राजकीय होता, मग डॉक्टरांनी केलेल्या टेस्ट खोट्या होत्या का असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, डॉक्टरांनी माझा आताच बीपी चेक केला. माझा बीपी 152 पर्यंत लो झाला आहे. मग डॉक्टरांनी आतापर्यंत माझ्या ज्या काही टेस्ट केल्या त्या खोट्या आहेत का? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. प्रश्न आम्ही देखील विचारू शकतो. जेव्हा सरकार पाडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच त्यांना कोरोना कसा होतो? असे म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.
विरोधक माझ्यावर टीका करताना म्हणाले की माझा आजार राजकीय होता. जामीन मिळाल्यानंतर लगेच बरे वाटले. कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं किती योग्य आहे, हे तपासण्याची वेळ आलीये. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. सध्या मला बीपीचा त्रास आहे. तसेच पाठीच्या मनक्याचा देखील त्रास आहे. त्यामुळे मी आता काही काळ आराम करणार आहे. त्यानंतर पुन्हा कामाला लागेल. दीड महिन्यापासून मी मतदारसंघात गेलो नाही. माझ्यावर गोव्याची देखील जबाबदारी आहे, त्यामुळे तिथेही जावे लागणार आहे. मी तब्येत सांभाळून काम करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी