‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…’, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, फडणवीसांकडून चिंता व्यक्त
त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या तिन्ही शहरात मुस्लिम समाजाकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यात अनेक चारचाकी वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या तिन्ही शहरात मुस्लिम समाजाकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चावेळी आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यात अनेक चारचाकी वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. (Nitesh Rane warns Mahavikas Aghadi government over violence in Muslim front)
मुस्लिम समाजाच्या मोर्चावेळी झालेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. ‘हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील. हे राज्य सरकारनं लक्षात घ्यावं’, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलंय.
हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाहीत.. तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील.. हे राज्य सरकार नी लक्षात ठेवावे !!!
— nitesh rane (@NiteshNRane) November 12, 2021
त्यांना धडा शिकवा – चंद्रकांत पाटील
राज्यातील काही शहरात त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटल्यानंतर त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विदेशात जरी घटना घडली तर भारतात हिंसा करायची हे न कळणारं आहे. देशाचे नागरिक आहात तर मूठभर लोक देशभक्त मुस्लिमांना का बदनाम करतात? मुस्लिम समाजाला बदनाम करणाऱ्या या मूठभर लोकांना त्यांना धडा शिकवला पाहिजे, असं सांगतानाच परिस्थिती चिघळू नये याकडे सरकारने लक्ष द्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं. तर, लोकशाहीत काही लोक काहीही बोलतात. त्यामुळे तुम्ही संतप्त होऊ नका. वातावरण बिघडवू नका. शांतता पाळा. आंदोलन चिघळू देऊ नका, असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.
देवेंद्र फडणवीसांकडून चिंता व्यक्त
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसंच सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. ‘त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!’, असं ट्विट फडणवीसांनी केलंय.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
नांदेडमध्ये दगडफेक, चारचाकी, दुकानांचं नुकसान
त्रिपुरा इथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून नांदेडमध्ये शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. तसंच निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचं नुकसान करण्यात आलं. तसंच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचं मोठं नुकसान करण्यात आलं.
इतर बातम्या :
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक
Nitesh Rane warns Mahavikas Aghadi government over violence in Muslim front