तर लग्न होणार नाही; घरातील मंडळी नितीन गडकरी यांना असं का म्हणायचे? नेमका किस्सा काय?
मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तिथे मला लढण्यास मनाई करण्यात आली होती. तुम्ही जिंकणार नाही असं सांगितलं होतं. पण मी लढलो आणि साडे तीन लाखाच्या मतांनी जिंकलो.
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) ज्या कार्यक्रमात असतात तिथे तुफान फटकेबाजी होते. आपल्या खास शैलीत गडकरी जेव्हा भाषण करतात तेव्हा हास्याची बरसात होते. टीका, खोचक टोले, राजकीय गौप्यस्फोट, सडेतोडपणा, किस्से, विनोद आणि तरुणांना प्रेरणा देणारी विधान ही आयुधं परजत गडकरी आपल्या भाषणाने (speech) लोकांना एका जागेवर बांधून ठेवतात. हल्ली त्यांच्या भाषणात किस्से आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टींची भरपूर रेलचेल असते. मुंबई आयआयटीच्या (mumbai iit) कार्यक्रमातही त्यांनी असाच एक किस्सा सांगून सर्वांना हसवलेच, पण आयुष्य कसं घडवावं याची प्रेरणाही दिली.
Addressing Alankar 2022 – the annual business festival of Shailesh J. Mehta School of Management, IIT Bombay https://t.co/tpf2vSJwF2
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 29, 2022
मला घरात सर्वजण म्हणायचे अरे नोकरी कर. नोकरीच्या मागे लाग. जाहिराती पाहून अर्ज कर. नोकरी नाही केली तर लग्न होणार नाही. घरची मंडळी सारखा हा तगादा लावायची. त्यामुळे मी वैतागायचो. मीही त्यांना म्हणायचो, मला नोकरी करायची नाही. मी नोकरी करणार नाही. मला नोकरी करणारा व्हायचं नाही. मला नोकरी देणारा व्हायचं आहे. त्यामुळे मी काही इंजिनीयर झालो नाही. पण आज मी नोकरी देणारा झालो आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला.
सहकाऱ्यांशी चांगला व्यवहार करा. मी मोठा आहे. मला अधिक समजतं तुला काय समजतं असं वागू नका. अहंकार बाळगू नका. तुम्ही छोट्यातील छोट्या व्यक्तीशी चांगलं वागलात तर तो तुमच्यासाठी खूप काम करेल. माझ्या आयुष्यातील अनुभव आहे. मी राज्यात पीडब्लूय मिनिस्टर होतो. सोलापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये एक खानसामा होता. नंतर माझं मंत्रिपद गेलं. मंत्रिपद गेल्यावर जेव्हा केव्हा मी सोलापूरला जायचो. तेव्हा तो डबा घेऊन यायचा. रात्री गाडी यायची. तेव्हा तो टिफीन घेऊन यायचा.
तेव्हा मी त्याला म्हटलं तुम्ही टिफीन घेऊन का येता? मी काही मंत्री नाही. सरकारमध्ये नाही. त्यामुळे तू का येतो टिफीन घेऊन? तेव्हा त्याने मला सांगितल, सर जेव्हा तुम्ही मंत्री होता, तेव्हा मला खूप प्रेम दिला. माझं प्रमोशन केलं. माझ्याशी चांगला वागला. मला प्रेम दिलं. त्यामुळे आदर म्हणून मी तुम्हाला टिफीन घेऊन येत असतो. हे सांगताना त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मला काही नको. तुम्ही फक्त माझी पोळी भाजी खाल्ली तरी मला आनंद होईल, असं तो म्हणाला. तेव्हापासून मी त्याला कधीच रोखलं नाही. अजूनही मी जेव्हा सोलापूरला जातो तेव्हा मला टिफीन घेऊन येतो. आता तो निवृत्त झाला आहे, असा किस्सा त्यांनी सांगितलं.
मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तिथे मला लढण्यास मनाई करण्यात आली होती. तुम्ही जिंकणार नाही असं सांगितलं होतं. पण मी लढलो आणि साडे तीन लाखाच्या मतांनी जिंकलो. यावेळीही मी लढणार असून पाच लाख मते घेऊन विजयी होणार आहे, असंही ते म्हणाले. फोटो लावणार नाही, कटआऊट लावणार नाही. खाऊ पिऊ घालणार नाही हे मी ठरवलं आहे. माझ्या हिशोबाने निवडणूक लढणार. लोकं मला मतं देतील याचा मला विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं.
जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, तेव्हा कास्ट, कॅश आणि रिलिजन या सर्व गोष्टी मागे पडतात. सर्व लोक तुम्हाला मदत करतात. त्यामुळे तुम्हीही लीडर बनणार आहात. बिझनेस लीडर बनणार आहात. त्यामुळे तुम्ही मॅनेजमेंटवर अधिक भर द्या, असा सल्ला त्यांनी दिला.