रामाच्या जन्मस्थानी मंदिर होणार नाही, मग कुठे होणार? : गडकरी
मुंबई : राम हा या देशाचा इतिहास आहे. त्यामुळे राम मंदिर बनलं पाहिजे. तसेही, रामाचं मंदिर जर रामाच्या जन्मस्थानी होणार नाही, मग कुठल्या स्थानी होणार? असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. तसेच, कोट्यवधी भारतीयांना राम हे आदर्श पुरुष […]
मुंबई : राम हा या देशाचा इतिहास आहे. त्यामुळे राम मंदिर बनलं पाहिजे. तसेही, रामाचं मंदिर जर रामाच्या जन्मस्थानी होणार नाही, मग कुठल्या स्थानी होणार? असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. तसेच, कोट्यवधी भारतीयांना राम हे आदर्श पुरुष वाटतात, असेही नितीन गडकरींनी नमूद केले.
राम मंदिर आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत असते. राम मंदिर हा भाजपचा पूर्वीपासूनचा मुद्दा, आमचा विकासाचा मुद्दा सोडलेला नाही, असेही यावेळी गडकरी म्हणाले.
विजय मल्ल्याबाबत गडकरी काय म्हणाले?
“विजय मल्ल्यांचा बिझनेस 40 वर्षे नीट होता, मात्र अडचणीत आल्यावर तो फ्रॉड कसा? मला मल्ल्याशी काही घेणेदेणे नाही. मी एकंदरीत बँक सिस्टमचा मुद्दा मांडला होता. विजय मल्ल्याने फ्रॉड केला असेल तर कायद्याने शिक्षा होईल, पण मी बँकिंगबद्दल बोलतोय, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या.” असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच, बँकांचा अॅप्रोच असा असला पाहिजे की, अडचणीतल्या माणसाला बाहेर काढलं पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमधील मतांचा फरक केवळ 43 हजारांचा आहे, मात्र हार ही हार असते नि विजय हा विजय असतो, आम्ही पराभव स्वीकारला आहे, असे सांगताना नितीन गडकरी पुढे म्हणाले, “तिसऱ्या आघाडीतील पक्ष एकमेकांकडे बघत नव्हते, त्यांना आता आमची भिती आहे, त्यामुळेच ते एकत्र आले आहेत.”
जे विकासावर निवडणुका लढवू शकत नाहीत, ते जाती-धर्मावर समाजात भांडणं लावून मतं मिळवतात, असेही गडकरी म्हणाले.
“मी पक्षाचा कार्यकर्ता, जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं. मला पंतप्रधान पदाची आशा नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या निवडणुक लढू. आता कुठेही नेतृत्व बदलाविषयी चर्चा नाही”, असे सांगतना गडकरी पुढे म्हणाले, “कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना विश्वासात घेऊन पंतप्रधान निर्णय घेतात. आमच्या पक्षात लोकशाही आहे, पक्ष कार्यकर्त्यांचा, राष्ट्रविचारांचा आणि देशभक्तांचा आहे, कोण्याही एका नेत्याचा नाही.”