Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचले आाहेत. कालच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरादार निशाणा साधला असताना या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आज भाजप नेत्यांनीही दिवसभर राज ठाकरेंचा गोडवा गायला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचले आाहेत. कालच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरादार निशाणा साधला असताना या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आज भाजप नेत्यांनीही दिवसभर राज ठाकरेंचा गोडवा गायला आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर मनसे-भाजपच्या युतीच्या (Mns Bjp Alliance) जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे कालच्या सभेत राज ठाकरेंनी भाजपवर एकही शब्द टिका केली नाही. तर महाविकास आघाडीवर राज ठाकरे गारा बरसल्यासारखे एकामागोमाग एक बरसत होते. त्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरेंचा समाचार घेत सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा अजित पवारांकडे वळवला. त्यानंतर त्यांनी मशीदीवरील भोंग्यांवरून जोरदार बॅटिंग सुरू केली.
कोणताही नियोजित दौरा नव्हता
नितीन गडकरींच्या भेटीमागील टायमिंग याबाबत आता जोरदार चर्चा आहे. हा कुठलाही नियोजित दौरा नव्हता. राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक करण्यासाठी नितीन गडकरी थेट शिवतीर्थावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. आज भाजप नेते दिवसभर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ वक्तव्य करत होते. अगदी नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मोहीत कंबोज यांच्यापर्यंत सर्व नेते राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करताना दिसून आले. त्यामुळे ही साखळी जोडली जातेय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कालच राज ठाकरेंचं भाषण काल भाषण संपल्यापासून सुरू आहे. त्यामुळे आता गडकरींच्या भेटीनंतर युतीची प्रक्रिया सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रतली राजकीय परिस्थिती आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर टीका केल्यावर सहाजिकच या भेटीत राजकीय चर्चा होणार. मात्र नितीन गडकरी आणि राज ठाकरेंचं चांगले संबंध आहेत. मात्र या भेटीवरून लगेच अनुमान काढू नये. जे काही होईल ते पक्षीय पातळीवर होईल. मात्र राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि भाजपची भूमिका एक असल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली आहे, असे सूचक विधान प्रवीण दरेकरांनी केलं आहे. असा एखादा नेता जर हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठोस उभा राहत असेल तर नकारात्मकता घेण्याचे कारण नाही, असेही संकेत दरेकारांनी दिले आहेत.