फडणवीसांच्या मतदारसंघात… एका संघटनेचं कार्यालय, भगवा झेंडा, त्यावर काळी पिस्तुल!! नितीन राऊतांचा आक्षेप काय?
गृहमंत्र्यांच्या मतदार संघात पोलिसांनी जाऊन तो झेंडा उतरवला. तो बोर्ड उतरवला. पण कुणावरही कारवाई केली नाही. का कुठला प्रकार आहे? असा सवाल नितीन राऊत यांनी केलाय.

गजानन उमाटे, नागपूरः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मतदार संघात आतंकवादी प्रवृत्ती रुजवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. नागपुरात नथुराम हिंदूसेना (Nathuram Hindesena) नावाच्या संघटनेचं कार्यालय उघडलं गेलं, पोलिसांनी सदर संघटनेचा बोर्ड आणि त्यावरचा आक्षेपार्ह भगवा झेंडा काढला असला तरी या प्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही, असा आक्षेप नितीन राऊत यांनी घेतला आहे.
नागपुरात नितीन राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात नाथूराम हिंदुसेना नावाच्या संघटनेनं एक कार्यालय उघडलं. त्या ठिकाणी जो भगवा झेंडा होता, त्या ठिकाणी काळ्या रंगात पिस्तुल दिलेलं आहे…. नितीन राऊत यांनी या भगव्या झेंड्याचे फोटोही माध्यमांना दाखवले.
या देशाचा पहिला आतंकवादी ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वध केला, ती प्रवृत्ती या देशात रुजवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला.
तसेच गृहमंत्र्यांच्या मतदार संघात पोलिसांनी जाऊन तो झेंडा उतरवला. तो बोर्ड उतरवला. पण कुणावरही कारवाई केली नाही. का कुठला प्रकार आहे? या देशात आपण फुले-शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. समता पूरक विचारांच्या देशात असं वर्तन खपवून घेणार आहात का? असा सवाल नितीन राऊत यांनी केला.
भीमा कोरेगावात साजऱ्या होणाऱ्या शौर्यदिनाला करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. त्यालाही नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भीमा कोरेगावातला विजयस्तंभ तोडून टाकू, असं आवाहन करणी सेनेचे अजय सेंगर यांनी दिलंय. त्यानंतर असे चिथावणीखोर वक्तव्य करायची असतील तर इथे येऊनच दाखवा, विजयस्तंभ पाडून दाखवा, आम्हीही भीमसैनिक आहोत, असं चॅलेंज नितीन राऊत यांनी दिलंय.