पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आठव्यांदा बिहारच्या (bihar) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून त्यांचे दर्शन घेतले. गेल्या 22 वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.
भाजप पक्षाकडून जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली. काल आमदार आणि खासदारांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यात भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा आकडा सादर केला. त्यानंतर आज राजभवनात छोटेखानी समारंभात या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.
दरम्यान, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचं दोन्ही नेत्यांचं ठरलं आहे. त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 21 मंत्रीपदे मिळणार आहेत. डाव्यांना चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर काँग्रेसलाही चांगली खाती दिली जाणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर तेजस्वी यादव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि अर्थ खातं राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर काँग्रेसला महसूल खातं दिलं जाणार आहे.
गेल्या काही वर्षात नितीश कुमार आणि आरजेडी दरम्यान शाब्दिक युद्ध रंगलं होतं. लालूप्रसाद यादव यांनी तर नितीश कुमार यांना साप म्हटलं होतं. नितीश कुमार यांनीही लालूंवर पलटवार केला होता. त्यावर राबडी देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जूनं सर्व काही माफ आहे. सर्व काही विसरून पुढे जायचं आहे, असं राबडी देवी म्हणाल्या.