नितीशकुमार पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत कुठेच नाही, आमची लढाई फक्त… अमित शहा यांचं मोठं विधान
सीबीआयने राहुल गांधी यांची चौकशी केली. सीबीआय राहुल गांधींना घाबरली नाही. तर तेजस्वी यादवांना का घाबरणार? असंही ते म्हणाले.
पूर्णिया: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजप (BJP) अधिकच आक्रमक झाली आहे. यापुढे नितीश कुमार यांच्याशी कधीच युती करणार नसल्याचं भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच नितीश कुमार हे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नाहीत. ते कुठूनही निवडणूक लढणार नाहीत. विरोधकांकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोणी असतील तर ते राहुल गांधीच असतील, असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
अमित शहा यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही बिहारमध्ये कमीत कमी 32 जागांवर विजय मिळवू. आता नितीश कुमार यांचे भाजपमध्ये येण्याचे सर्व रस्ते बंद झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
नितीश कुमार हे आरजेडीसोबत गेले हे समजू शकतो. पण त्यांनी भाजपची साथ का सोडली? हे समजणं अवघड आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोन्ही नेते बिहारची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करेल. 2025मध्ये आम्ही संपूर्ण बहुमत घेऊन बिहारच्या सत्तेत येऊ. आम्हाला काहीच घाई नाही. आमचा फोकस केवळ 2024च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. आम्ही बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करू आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवू, असंही त्यांनी सांगितलं.
तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादवांसारखेच आहेत. जसा बाप तसाच मुलगा निघाला. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचं आता वय झालं आहे. सीबीआयने राहुल गांधी यांची चौकशी केली. सीबीआय राहुल गांधींना घाबरली नाही. तर तेजस्वी यादवांना का घाबरणार? असंही ते म्हणाले.
सीमांचलला केंद्रशासित प्रदेश केला जाणार नाही. सीमांचल हा बिहारचाच एक भाग म्हणून राहील. सर्वांचं संरक्षण केलं जाईल. कुणालाही असुरक्षित वाटणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.