पंकजा मुंडे यांच्याशी असलेल्या मतभेदावर धनंजय मुंडे काय म्हणाले?; भाषण संपताच…
राष्ट्रवादीचे नेते, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बीडमध्ये एकाच मंचावर आले. शासन आपल्या दारीच्या निमित्ताने दोन्ही भाऊ बहीण एकाच मंचावर आल्याने बीडकरांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही भाऊबहीण एकत्र येणार असल्याने बीडमध्ये या कार्यक्रमासाठी अभूतपूर्व गर्दी जमली होती. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा यांनी एकमेकांची स्तुती केली. एकत्र काम करण्याची ग्वाहीही दिली.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 5 डिसेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रृत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेल्याने मुंडे भावाबहिणीतील ही कटुता काही अंशी कमी झाली आहे. आज तर बीडमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले. यावेळी दोघांनीही भाषणात एकमेकांचं कौतुक केलं. त्यानंतर स्टेजवरून उतरताच धनंजय मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. आमच्यात मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
माझ्यात आणि पंकजामध्ये मनभेद नव्हते. जे राजकीय मतभेद होते ते सरकारमध्ये एकत्र आल्याने संपले. बीड जिल्ह्यातील सर्वांना वाटत होतं की, पंकजा आणि मी दोघांनी एकत्रित काम करावं, असं सांगतानाच पंकजा मुंडे लोकसभेवर असणार की नाही याबाबत थोडासा संयम पाळा, थोडा सस्पेन्स ठेवा. तुम्हालाही आगामी काळासाठी काही सस्पेन्स ठेवा. आताच सगळं कशाला करताय, असं सूचक विधान धनंजय मुंडे यांनी केलं.
मतभेद असायचे कारण नव्हते
राजकारणात राजकीय मतभेद होते. मात्र आता सगळे विचाराने एक आल्याने ते दूर झाले. राजकीय मतभेद असले तरी आमच्या बहीण भावामध्ये मतभेद असायचे कारण नव्हते. यापूर्वी देखील आम्ही एकत्र कार्यक्रमात आलो. मात्र वेगवेगळ्या विचारांचे होतो. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेन भाऊ आणि अजितदादा एकत्र आल्यामुळे सर्व जिल्ह्यातील नेते एका व्यासपीठावर दिसले, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं
परळी हे तीन ऊर्जेचे शक्तीपीठ आहे. त्यामुळे योगायोगाने आज परळीमध्ये महायुतीची महाऊर्जा पूर्ण बीड जिल्ह्यात एकत्र आली. या पुढच्या काळात सर्व कार्यक्रमांमध्ये ही ऊर्जा पाहायला मिळेल. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असे मला वाटले नव्हते. मात्र बीड जिल्ह्याच्या जनतेने हायुतीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्यांदाच महायुतीचं सरकार व्यासपीठावर दिसत होतं. मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यासाठी पंधराशे कोटी रुपये दिले. तसेच आज जाता जाता 140 कोटी रुपये नगरोत्थान टप्पा दोन साठी दिले, अशी माहितीही त्यांनी दिली.