ना ठाकरे, ना शिंदे! दसरा मेळावा परवानगी वादात मोठा ट्विस्ट
खरी शिवसेना कुणाची हा निर्णय न्यायालयात प्रलंबीत असल्यानं कोणत्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची हा निर्णय महापालिका घेऊ शकत नाही असं मत महालिकेच्या विधी व न्याय विभागाने मांडले आहे.
मुंबई : शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क वर दसरा मेळावा(Shivsena Dasara Melava 2022) मिळण्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळावा परवानगी वादात आता मोठा ट्विस्ट आला आहे. दसरा मेळावा परवानगी नाट्यात आता राज्याच्या दोन महत्वाच्या विभागांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिस आणि गृहविभाग शिवाजी पार्क वर दसरा मेळावा घेण्याबाबत आपली भूमिका मांडणार आहे. दोन्ही गटाला परवानगी न देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर परवानगी न देण्याच्या हालचाली या दोन्ही विभागांकडून होणार आहेत. कुणालाच परवानगी ने देण्याची सूचना मुंबई पोलीस आणि गृहविभाग मुंबई पालिकेला करणार असल्याचे समजते.
खरी शिवसेना कुणाची हा निर्णय न्यायालयात प्रलंबीत असल्यानं कोणत्या गटाच्या अर्जाला परवानगी द्यायची हा निर्णय महापालिका घेऊ शकत नाही असं मत महालिकेच्या विधी व न्याय विभागाने मांडले आहे.
दरवर्षी दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या अर्जाला परवानगी नियमानुसार दिली जाते. मात्र, यंदा शिवसेनेचा कोणता अर्ज अधिकृत हे विधी विभाग ठरवु शकत नाही.
त्यामुळे, दसरा मेळाव्याकरता कोणत्याही गटाच्या अर्जाला परवानगी देऊ नये अशी महापालिका अधिका-यांची भूमीका असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर परवानगी मिळवण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेच्या जी नॉर्थ विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि परवानगीची मागणी केली.
कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. दोन्ही गट सध्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
मुंबई महापालिकेचा निर्णय प्रलंबित असताना शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे.
यामुळे शिंदे गटाला दसरा मेळावा दुसरीकडे घ्यावयचा झाल्यास बीकेसे मैदान हे पर्यायी जागा त्यांना उपलब्ध झाली आहे.