गुवाहाटी: आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही शिवसेनेतच (Shivsena) आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेना सोडली असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे सैनिकच राहणार आहोत. फक्त विधानसभेत गटाला काय नाव असावं याची चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच शिवसेनेकडे 55 आमदार होते. आता आमची संख्या 50च्यावर झाली आहे. त्यामुळे 16 आमदार एकत्र येऊन एवढी मोठी संख्या ज्याच्यापाठी आहे, अशा नेत्याला गटनेतेपदावरून हटवू शकत नाही, असं शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी सांगितलं. तसेच शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिंदे असा सामना थेट कोर्टातच होणार असल्याचं दिसत आहे.
दीपक केसरकर यांनी झूम अॅपवरून पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही शिवसेना हायजॅक केली नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेविरोधात बंड पुकारलेलं नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना हायजॅक केली असं म्हणणं योग्य नाही. काही अडचणी होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको अशी आमची मागणी होती. आम्ही सातत्याने पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. भाजप हा आपला जुना मित्रं पक्ष आहे. त्यांच्यासोबतच युती असावी असंही आम्ही वारंवार सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही, असं दीपक केसरकर यांनी सांगितंल.
आमचा गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. नाही तर आम्हाला कोर्टात जावेच लागेल, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ कमी आहे. त्यामुळे शिंदे यांना गटनेतेपदावरून कुणीही हटवू शकत नाही. आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. त्यामुळे गटनेते पदावर आमचा क्लेम राहतो. तो नाकारल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असं सांगतानाच आमदारांना नोटीस बजावली जात आहे. त्याला आम्ही कोर्टातच उत्तरे देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी विश्वासू होतो आणि आहे, कुणीही मला विश्वासाहर्ता शिकवू नये. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ. आमचा गट घेऊन आम्ही मुंबईत येऊ. तिथं आम्ही बहुमत सिद्ध करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.