मुंबई : आमदार अपात्र ठरल्यावर सरकार आणि गद्दारांचा गट संपुष्टात येईल. शिवसेनेचा नेता म्हणून मला या गोष्टीची खात्री आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री अपात्र ठरतील. हे 16 आमदार अपात्र ठरणार असतील तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार क्षणभरही राहणार नाही. हे सरकार जाईल, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकाला आधी त्यावर भाष्य करणं हा मूर्खपणा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. निर्णय माझ्याकडेच येईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणत असतील तर असं बोलणं मूर्खपणाच आहे. असं फडणवीसच म्हणतात ते फडणवीस आणि नार्वेकर यांनी पाहून घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले.
निकाला आधी फडणवीसच प्रतिक्रिया देत आहेत. अनेक दिवसांपासून तेच बोलत आहेत. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. निकाल आमच्या बाजूने लागेल असं ते म्हणत आहेत. हा मूर्खपणा कोण करत आहे? आता त्यांना बुद्धी सूचली असेल तर त्यांना सत्याची जाणीव झाली आहे. ते आणि ज्यांना त्यांनी मांडीवर घेतले ते मूर्ख सगळे बोलत आहेत की निकाल आमच्या बाजूने लागणार. असं बोलणं न्यायालयचा अपमान आहे. तेच म्हणतोय. निकालाच्या आधी बोलणं मूर्खपणा आहे तर फडणवीस यांनी मूर्खांना आवरलं पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
आम्ही निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत. सर्वोच्च न्यायालय संविधानाची लोकशाहीची हत्या करणार नाही. या देशात लोकशाही आहे की नाही. या देशात स्वातंत्र्य टिकलं की नाही हे आजच्या फैसल्यातून स्पष्ट होईल. या देशात संसद विधानसभेचं महत्त्व आहे की नाही? या देशात न्यायालय स्वतंत्र आहे की नाही हे आज स्पष्ट होईल. आजच्या फैसल्यावर स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.