Uddhav Thackeray : फक्त एक आमदाराच नाही, तर…नव्या वर्षात ठाकरे उद्धव गटासाठी धक्क्यांची मालिका
Uddhav Thackeray : नव्या वर्षात उद्धव ठाकरे गटाला मोठे धक्के बसू शकतात. सध्या कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण फक्त एकटे राजन साळवीच नव्हे तर आणखी काही जण शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणारं वर्ष उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक असेल.
नवीन वर्ष 2025 उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याच चित्र दिसू लागलं आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीच सरकार कोसळलं, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना विविध राजकीय आवाहनं पेलावी लागत आहेत. आता, तर पक्ष एकसंध ठेवण्याच सर्वात मोठ आव्हान त्यांच्यासमोर आहे. नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. अशावेळी पक्षात कुठलीही फाटाफूट होऊ नये, पदाधिकारी, कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल म्हणजे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. या निकालाने एकप्रकारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना यावर शिक्कामोर्तब केलं.
आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आमदार आहेत. तेच उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे फक्त 20 आमदार आहेत. ठाकरेंकडे मुंबईतील आमदारांची संख्या जास्त आहे. पण राज्याच्या बहुतांश भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य असल्याचा संदेश या निकालातून गेला आहे. आता नवीन वर्षात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे कोकणातील विश्वासू मानले जाणारे नेते राजन साळवी हे 12 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच वृत्त आहे. अत्यंत कठीण काळातही राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बाहेर पडले, त्यावेळी साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यांना फोडण्याचे बरेच प्रयत्न झाले. चौकशीचा ससेमिरा मागे लागला. पण साळवी ठाकरेंसोबत राहिलेत. पण आता ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे.
फक्त एक आमदार नाही, तर….
फक्त राजन साळवीच नाही, तर पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवकही भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ते पुण्यात जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार अशी माहिती आहे. विलेपार्ल्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी जितेंद्र जनावळे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे फक्त एक आमदार नाही, तर माजी नगरसेवकाही भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल.