Shiv Sena : आता शिवसेनेला ओबीसी चेहरा मिळणार, ओबीसी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा आज शिवसेनेत प्रवेश; शिवबंधनासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Shiv Sena :ओबीसींना आरक्षण देण्यात शिवसेनेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेला ओबीसींना आरक्षण देता आलं नाही, असाही शिवसेनेवर आरोप होत आहे. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेवरील हे आरोप सेनेला खोडता येणार आहेत.
पुणे : शिवसेनेत आमदार आणि खासदारांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेचं (shivsena) काय होणार? असा सवाल केला जात होता. मात्र, इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्याच आठवड्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद देण्यात आलं आहे. आज राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य (ओबीसी आयोग) लक्ष्मण हाके (laxman hake) हे हातात शिवबंधन बांधणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला दलित चेहऱ्यानंतर आता ओबीसी चेहराही मिळणार आहे. हाके यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ओबीसी आरक्षण आणि शिवसेनेची भूमिका मांडणारा एक प्रभावी नेता शिवसेनेला मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. ते आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन हातात शिवबंधन बांधणार आहेत. मातोश्रीवर येऊन ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून हाके यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि तपास यंत्रणांकडून शिवसेना नेत्यांवर होत असलेली कारवाई या पार्श्वभूमीवर हाके यांचा शिवसेना प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
ओबीसींमध्ये शिवसेनेची भूमिका जाणार
दरम्यान, ओबीसींना आरक्षण देण्यात शिवसेनेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेला ओबीसींना आरक्षण देता आलं नाही, असाही शिवसेनेवर आरोप होत आहे. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेवरील हे आरोप सेनेला खोडता येणार आहेत. स्वत: हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. त्यामुळे आयोगाचं काम आणि ठाकरे सरकारने केलेलं काम याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते या प्रश्नावर अधिकारवाणीने बोलू शकतात. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ते भाजपलाही उघडं पाडू शकतात. त्यामुळे हाके यांचा शिवसेना प्रवेश शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दलित-ओबीसींपर्यंत शिवसेना जाणार
सुषमा आंधारे या दलित नेत्या आहेत. तर लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते आहेत. हे दोन्ही नेते शिवसेनेत आल्याने आता शिवसेनेला दलित आणि ओबीसींमध्ये आपली पाळंमुळं रोवता येणार आहेत. या दोन्ही समाजात शिवसेनेची ताकद वाढवण्यात या दोन्ही नेत्यांमुळे शिवसेनेला फायदाच होणार आहे.