OBC Reservation : ‘राज्य सरकारमधील मंत्री खोटारडे, बदमाश, लफंगे; हे सरकार हिरवळीवरील विषारी साप’, OBC आरक्षणावरुन लोणीकरांची जीभ घसरली
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर जहरी टीका केलीय. सरकारवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. 'राज्य सरकारमधील मंत्री खोटारडे, बदमाश, लफंगे; हे सरकार हिरवळीवरील विषारी साप', अशी घणाघाती टीका लोणीकरांनी केलीय.
जालना : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मध्ये प्रदेशात ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांना परवानगी दिलीय. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच होणार आहेत. अशावेळी विरोधी पक्षातील नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय. माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर जहरी टीका केलीय. सरकारवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. ‘राज्य सरकारमधील मंत्री खोटारडे, बदमाश, लफंगे; हे सरकार हिरवळीवरील विषारी साप’, अशी घणाघाती टीका लोणीकरांनी केलीय.
ओबीसी आरक्षणावर बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. लोणीकर म्हणाले की, राज्य सरकारमधील मंत्री खोटारडे, बदमाश, लफंगे आहेत. या सरकारला आणि सरकारमधील मंत्र्यांना समुद्रात बुडवले पाहिजे. हे सरकार खोटारडं आहे. पंतप्रधान मोदींनी इम्पेरिकल डेटा दिला नाही असं सांगणाऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राज्यातील एकाही मुख्यमंत्र्यांना डेटा दिला नाही. हे सरकार हिरवळीवर विषारी साप असल्याची टीकाही लोणीकर यांनी केलीय.
‘फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत OBC आरक्षणासाठी आमचा प्रयत्न’
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका घेऊ. मात्र हे करत असताना ओबीसी आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
उदय सामंतांचं देवेंद्र फडणवीसांकडे बोट
मध्यप्रदेशला जो न्याय मिळाला तोच न्याय महाराष्ट्रात मिळू शकेल. ओबीसी आरक्षणाचे निकष मध्यप्रदेश राज्याला लागले, तो निकष समोर ठेवून ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार नक्की पाठपुरावा करेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. आरक्षण देणं हे सरकारच्या हातात नाही हे न्यायदेवतेच्या हातात आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन वर्षांपूर्वी बोलले होते. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे फडणवीस यांच्याबाबत मी अधिक बोलणं योग्य नाही, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.