शिवसेनेच्या पहिल्या यादीत एका विद्यमान खासदाराला डच्चू
मुंबई : शिवसेनेने 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, शिवसेनेने पहिल्या यादीतून एका विद्यमान खासदाराला डच्चू दिला आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली नाही. उस्मानाबादमधून शिवसेनेने विद्यमान रवींद्र गायकवाड यांच्या ऐवजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. ओमराजे हे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. […]
मुंबई : शिवसेनेने 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, शिवसेनेने पहिल्या यादीतून एका विद्यमान खासदाराला डच्चू दिला आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली नाही.
उस्मानाबादमधून शिवसेनेने विद्यमान रवींद्र गायकवाड यांच्या ऐवजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. ओमराजे हे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. उस्मानाबादमध्ये निंबाळकर कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा शिवसेनेला ओमराजेंच्या रुपाने होण्याची शक्यता आहे.
वाचा : लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर
शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सना चप्पल मारहाणप्रकरणी रवींद्र गायकवाड चर्चेत आले होते. रवींद्र गायकवाड यांच्याबद्दल उस्मानाबादमधील स्थानिक शिवसैनिकांमध्येही प्रचंड नाराजी होती. स्थानिक शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत रवींद्र गायकवाड यांच्याबद्दलची नाराजीही व्यक्त केली होती. अखेर शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं आहे.
राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या कांडानंतर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्तासंघर्ष सुरु आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांची सुमार कामगिरी आणि डॉ. पाटील परिवाराला कडवी झुंज देणारा उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली असून उमेदवारी जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी :
- दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
- दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे
- उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
- ठाणे- राजन विचारे
- कल्याण- श्रीकांत शिंदे
- रायगड – अनंत गीते
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
- कोल्हापूर- संजय मंडलिक
- हातकणंगले- धैर्यशील माने
- नाशिक- हेमंत गोडसे
- शिर्डी- सदाशिव लोखंडे
- शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील
- औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
- यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
- बुलडाणा- प्रतापराव जाधव
- रामटेक- कृपाल तुमाणे
- अमरावती- आनंदराव अडसूळ
- परभणी- संजय जाधव
- मावळ- श्रीरंग बारणे
- हिंगोली – हेमंत पाटील
- उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.