BJP Candidate List | ‘या’ दिवशी जाहीर होणार भाजपा उमेदवारांची दुसरी यादी, महाराष्ट्रातील नाव असतील का?
BJP Candidate List | भाजपा आणि काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. कारण दोन्ही पक्षांची घटक पक्षांसोबतची जागा वाटपाची बोलणी अजून अंतिम झालेली नाहीत.
BJP Candidate List (संदीप राजगोळकर) : आगामी लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. देशातील सर्वच राजकीय पक्षांची युती-आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? आणि कुठला उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याची मतदारराजाला उत्सुक्ता आहे. देशात NDA आणि INDIA या दोन प्रमुख आघाड्या असून मुख्य सामना या दोघांमध्येच आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांचे घटक आहेत. काँग्रेस देशातील मोठा पक्ष असला, तरी यावेळी भाजपा विरुद्ध प्रादेशिक पक्ष असाच सामना रंगणार आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस मोठा पक्ष आहे. पण त्या आघाडीत प्रादेशिक पक्षांचा दबदबा जास्त आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना आहे. यात महायुती NDA चा तर महाविकास आघाडी INDIA चा भाग आहे. येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात काही महत्त्वाचे राजकीय निर्णय होऊ शकतात.
भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मागच्याच आठवड्यात भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली, त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. कारण दोन्ही पक्षांची घटक पक्षांसोबतची जागा वाटपाची बोलणी अजून अंतिम झालेली नाहीत.
महाराष्ट्रातील उमेदवारांची नाव असतील का?
आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी 12 मार्चला जाहीर होणार आहे. 11 मार्चला राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 150 हून अधिक उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील उमेदवाराची नाव असतील का? या उत्सुक्ता आहे.