आजची सर्वात मोठी बातमी ! विधान परिषद निवडणुकीत महायुतीचंही एक मत फुटलं; जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा
विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झाले आहेत. मात्र निवडणुकीतील आकडेवारीचं अजूनही विश्लेषण सुरूच आहे. या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस नेत्यांनीही ते मान्य केलं आहे. पण या निवडणुकीत महायुतीचंही एक मत फुटल्याचा दावा शेकापचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यात काँग्रेस फुटल्याचं चित्रही निर्माण केलं जात आहे. पण जयंत पाटील यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. या निवडणुकीत भाजपचंही एक मत फुटलं असून ते मला पडल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या दाव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
युतीतील मित्र धावून आला
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. या निवडणुकीत मला एकूण 12 मते पडली. त्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची 11 मते होती. शरद पवार गटाचे 12 मते मला पडली नाही. त्यातील एक मत फुटलं. तर महायुतीचं एक मत फुटल्याने माझी मत संख्या 12 झाली, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. महायुतीतील माझ्या एका मित्राने मला त्याचं मत दिलं. तो कोण आहे हे मी सांगणार नाही. पण त्याने माझ्या खातर मला मतदान केलं, असा दावाही जयंत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
सीपीएमचं मत मिळालं नाही
राष्ट्रवादीची मते बरोबर पडली. महाविकास आघाडीतील बाकी मतंच मला पडली नाहीत. सोबत असणाऱ्यांनीही मत दिलं नाही. त्याचं वाईट वाटतं. अनेक वर्ष जे माझ्यासोबत होते, त्यांनीच मतदान केलं नाही. सीपीएमचं मत मिळालं नाही त्याचं सर्वात वाईट वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
एमआयएमचा संबंधच नाही
एमआयएमचा काही संबंध नाही. एमआयएमच्या नेत्यांना मी ओळखत नाही. जवळ आले तरी मी त्यांना ओळखणार नाही. त्यांच्यासोबत बोलायचं नाही हे आधीच ठरलं आहे. एमआयएमच्या मदतीची गरजच नव्हती. कारण माझ्याकडे मते होती. त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नाही, असा दावा त्यांनी केला.
अधिक सविस्तर बोलेन
वाढलेली 50 टक्के मते मला देणार म्हणून काँग्रेसने सांगितलं होतं. ते झालं नाही. शिवसेनेला सात मते गेली. चार मला आणि चार त्यांना जायला हवी होती. ते झालं नाही, आकडेवारीवरून सर्व दिसतं. मी यावर अधिक सविस्तर बोलेन. पण मला अभ्यास करायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.