Explainer : संसदेत उरले इंडिया आघाडीचे फक्त 40 खासदार, निलंबनाच्या कारवाईपासून वाचले हे नेते…
अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसचे केवळ 10 खासदार उरले आहेत. त्यापैकी एकाला पक्षातून निलंबीत करण्यात आलं आहे. तर, द्रमुकचे 8 खासदार, टीएमसीचे 9 खासदार सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.
नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. बुधवारी आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता 97 वर पोहोचली आहे. गेल्या गुरुवारपासून आतापर्यंत दोन्ही सभागृहातील एकूण 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. खासदारांच्या निलंबनामुळे लोकसभेत सध्या सहा पक्षांचा एकही खासदार उरलेला नाही. तर, लोकसभेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी तीन पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार पात्र राहिले आहेत. अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसचे केवळ 10 खासदार उरले आहेत. त्यापैकी एकाला पक्षातून निलंबीत करण्यात आलं आहे. तर, द्रमुकचे 8 खासदार, टीएमसीचे 9 खासदार सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे टीएमसीच्या उर्वरित नऊ खासदारांपैकी दोन खासदार हे भाजपसोबत आहेत.
कोणत्या पक्षाचे किती खासदार निलंबित झाले? आता किती बाकी आहेत?
सभागृहात सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे एकूण 48 खासदार आहेत. त्यातील 38 जणांचे निलंबन झालेय. त्यामुळे कॉंग्रेसचे केवळ 10 खासदार सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेऊ शकतात. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, दीपक बैज (बस्तर), नकुल नाथ (छिंदवाडा), व्हिन्सेंट पाला (शिलाँग), एमके राघवेंद्रन (केरळ), कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार), डीके सुरेश (बंगळुरू ग्रामीण), सप्तगिरी उल्का (कोरापुट) आणि पक्षाने निलंबन केलेल्या प्रनीत कौर (पटियाला) यांचे निलंबन झालेले नाही.
काँग्रेसनंतर पक्षनिहाय द्रमुक (8), टीएमसी (9), जेडीयू (5), राष्ट्रवादी (2), एसपीचे (1), नॅशनल कॉन्फरन्स (1), सीपीआय (1), समाजवादी पक्ष (1), जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (1) हे खासदार निलंबनापासून वाचले आहेत.
या पक्षांच्या सर्व खासदार निलंबित
केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि CPM यांचे लोकसभेत प्रत्येकी तीन खासदार आहेत. या दोन्ही पक्षाच्या तिन्ही खासदारांना निलंबित करण्यात आलंय. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी, केरळ काँग्रेस (एम), व्हीसीके आणि आरएसपी या पक्षांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. या पक्षांच्या खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
इंडिया आघाडीत असलेल्या या पक्षांच्या खासदार वाचले.
शिवसेना (UBT) आणि झारखंडचा (JMM) हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. या दोन्ही पक्षांच्या एकाही खासदाराला निलंबित करण्यात आलेले नाही. शिवसेनेचे (UBT) लोकसभेचे सहा खासदार आहेत. तर, झामुमोकडे एक खासदार आहे. या दोन्ही पक्षांच्या खासदारांसह इंडिया आघाडीचे केवळ 44 खासदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. काँग्रेसमधून निलंबित प्रणीत कौर, तृणमूल काँग्रेसचे बंडखोर शिशिर अधिकारी, दिवेंदू अधिकारी आणि राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे सुनील तटकरे यांना वगळल्यास ही संख्या ४० वर पोहोचते.