Osmanabad| संजय राठोड परत या, बंजारा समाजाची भावनिक साद, उस्मानाबाद शिवसैनिकांची मागणी
संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून यवतमाळ हा त्यांचा मतदार संघ आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे बंजारा समर्थक असून उस्मानाबादेतील त्यांच्या समर्थकांनी आज त्यांना हे भावनिक आवाहन केलं.
उस्मानाबादः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात शामिल बंडखोर आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड(sanjay Rathod) यांनी परत यावे, यासाठी बंजारा समाजातील लोकांनी आज त्यांना भावनिक साद घातली. एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडात संजय राठोड यांनी शामिल होऊ नये. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राठोड यांच्या वाईट दिवसांत त्यांना खूप मदत केली. तर दुसरीकडे भाजपच्या चित्रा वाघ आणि इतर नेत्यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहता संजय राठोड यांनी शिवसेनेला असा धोका देऊ नये, अशी मागणी उस्मानाबादेतील बंजारा समाजाने केली आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून यवतमाळ हा त्यांचा मतदार संघ आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे बंजारा समर्थक असून उस्मानाबादेतील त्यांच्या समर्थकांनी आज त्यांना हे भावनिक आवाहन केलं.
शिवसैनिकांचं म्हणणं काय?
उस्मानाबादमध्ये संजय राठोड यांच्या समर्थकांनी त्यांना भावनिक साद घातली. संजय राठोड यांच्या पडत्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी तुमच्या वाईट दिवसांमध्ये मदत केली. भाजप नेते, चित्र वाघ आदींनी राठोड यांच्यावर खूप आरोप केले. मात्र उद्धव ठाकरेंच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं समोर आलं. आज त्याच भाजपच्या इशार्यावर त्यांनी शिवसेनेला सोडून जाण्याची भूमिका घेतल्यामुळे तमाम बंजारा समाजबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. संजय राठोड निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे राठोड यांनी उद्धव ठाकरेंना आता धोका देऊ नये, अशी भावना बंजारा समाजानं व्यक्त केली आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, उपशहरप्रमुख युवराज राठोड, सतीश पवार, अशोक जाधव, सचिन राठोड, बाळासाहेब राठोड, महेश जाधव, संदीप राठोड, रवी राठोड, अरुण राठोड, दयानंद पवार, सुरेश राठोड, आकाश जाधव यांची उपस्थिती होती.
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार असून बंजारा समाजाचं ते नेतृत्व करतात. एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रीपद गमवावं लागलं होतं. मात्र पुढे पोलिसांच्या तपासात ते निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिमंडळावर घेण्याची मागणी बंजारा समाजातर्फे केली जात होती. उद्धव ठाकरे सरकारमुळेच संजय राठोड यांच्यावरील खोटे आरोप पुसले गेले, अशी भावना बंजारा समाजानं व्यक्त केली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटात संजय राठोड शामील झाल्याने बंजारा समाज दुःखी असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितलं.