Tanaji Sawant | महाविकास आघाडीत अपेक्षाभंग, तानाजी सावंतांची नाराजी शिंदे सरकार दूर करणार, कॅबिनेट मंत्रिपद मिळणार
मराठवाड्यातील संजय शिरसाट, संदिपान भूमरेंसह तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.
सोलापूरः महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंत (Tanaji sawant) यांना आता शिंदे सरकारमध्ये (Shinde Government) खातं मिळण्याची दाट शक्यता आहे. सामंत यांना मंत्रीपदाबाबत कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी शिवसेना-भाजप युतीत तानाजी सावंतांकडे मंत्रिपद होते. मात्र 2019 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. आता एकनाथ शिंदे गटात गेलेल्या बहुतांश आमदाारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उस्मानाबादेतून तानाजी सावंतांचीही कॅबिनेट मंत्र्यांमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आजा सकाळी अकरा वाजता होणार असून शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाबाबत फोन गेले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्यापूर्वी सर्व आमदारांची बैठक शिंदे यांच्या उपस्थित घेतली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
कोण आहेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि नंतर शिवसेनेत गेलेले नेते आहेत. भाजप आणि युती सरकारच्या काळात ते विधान परिषदेवर निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण खातं मिळालं होतं. त्यानंतर 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथून निवडून आले. त्यांनी अजित पवारंचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं. तेव्हापासून ते शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे तानाजी सावंत हे शिक्षण सम्राट आणि साखर सम्राट म्हणूनही ओळखले जातात. जयवंत शिक्षण प्रसाकर मंडळ अर्थात जेएसपीएमच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलंय. त्यानंतर त्यांनी साखर उद्योगात प्रवेश केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात त्यांनी सोनारी गावात भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना उभारला. या कारखान्याचे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास पाच युनिट आहेत.
अब्दुल सत्तारांना बोलावलं, पण मंत्रिपद?
मराठवाड्यातील संजय शिरसाट, संदिपान भूमरेंसह तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. मात्र आमदार अब्दुल सत्तार यांनादेखील मुंबईतून फोन आल्याची माहिती मिळाली आहे. टीईटी घोटाळ्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी बोगस प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उघड झाल्यामुळे अब्दुल सत्तार चर्चेत आले आहेत. या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तारांचा पत्ता कट झाल्याचीही चर्चा आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अब्दुल सत्तार यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. टीईटी प्रकरणी माझी बदनामी सुरु असून माझ्या मुलांनी या घोटाळ्यात कोणताही फायदा घेतलेला नाही, असं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय. मात्र याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही वक्तव्य सत्तार यांनी केलंय.