Tanaji Sawant | बीड का पालकमंत्री कैसा हो.. तानाजी सावंत जैसा हो, मंत्रिपदाची शपथ घेताच बीडमध्ये घोषणाबाजी, महादेवाला साकडं!
2019 मध्ये उस्मानामधील परंडा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. आता शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
बीडः उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदार संघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शिंदे (CM Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यानंतर राज्यातील विविध मराठा संघटनांकडून सरकारचे स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षणात तानाजी सावंत यांची कामगिरी चांगली आहे. आणि मराठी क्रांती मोर्चाचे बिजारोपण बीड जिल्ह्यातून झालं. त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांना देण्यात यावं अशी आग्रही मागणी छावा संघटनेने केली आहे. एकिकडे राज्यातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडत होता तर दुसरीकडे बीडमध्ये छावा संघटनेच्या वतीने तानाजी सावंत यांचं जल्लोषात स्वागत केलं जात होतं. बीडचं पालकमंत्री पद त्यांनाच मिळावं, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
बीडचं पालकमंत्री पद मिळणार?
महाविकास आघाडी सरकारमध्ये बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर आत एकनाथ शिंदे सरकारमध्ये उस्मानाबादचे आमदार तानाजी सावंत यांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणतंही खातं मिळालं तरी जनतेची सेवा करेन, असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं असलं तरीही त्यांच्या समर्थकांनी मात्र बीड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळावं, यासाठी देवाला साकडं घातलं. छावा संघटनेकडून बीडच्या महादेव मंदिरात दुग्धाभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली. छावाचे अध्यक्ष अशोक रोमन यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी महादेव मंदिरात साकडे घातले आहे. यावेळी बीड का पालकमंत्री कैसा हो तानाजी सावंत जैसा हो… अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून निघाले होते.
तानाजी सावंतांची राजकीय कारकीर्द काय?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे रहिवासी तानाजी सावंत हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. 2015 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 2016 मध्ये ते विधान परिषदेत आमदार झाले. 2019 मध्ये उस्मानामधील परंडा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. पुणे आणि सोलापुरात त्यांच्या शिक्षणसंस्था आहेत. तर उस्मानाबादमध्ये काही साखर कारखानेही त्यांच्या मालकीचे आहेत.