सर्व आमदारांनी घेतल्या शपथा… काय ठरलं?; अजितदादा गटाच्या बैठकीतील आतली बातमी आली समोर
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने अजितदादा गटात अस्वस्था पसरली आहे. अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अजितदादा गटाची मुंबईत तातडीची बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी शपथा घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अजितदादा गटात अधिक चुळबुळ उडाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे फक्त तीन खासदार असताना, त्यांच्या मागे आमदारांचं बळही नसतानाही शरद पवार गटाने अत्यंत चुरशीच्या लढतीत 8 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात अजितदादा नव्हे तर शरद पवार यांचाच सिक्का चालत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या आमदारांना टेन्शन आलं आहे. हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यामुळे काल अजितदादा गटाच्या बैठकीत आमदारांनी शपथा घेतल्याचं समोर आलं आहे. आम्ही अजितदादांना सोडून कुठेच जाणार नाही, अशी शपथच या आमदारांनी घेतल्याची माहितीसमोर आली आहे.
अजितदादा गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. काल आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्वच आमदारांनी शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही, अशी शपथ या आमदारांनी घेतल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच शरद पवार गटाचे नवीन मालक रोहित पवार यांनी शरद पवार गटात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
वाटा सुकर झाल्या
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं आवाहन आम्ही प्रचारात करत होतो. मोदींनी दहा वर्षात केलेली कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. आम्हाला या निवडणुकीत थोड्या कमी जागा आल्या. पण एनडीएचं सरकार आलं याचा आनंद अधिक आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. ते पाहता सर्वांच्या वाटा आमच्याकडे यायला सुकर झाल्या आहेत, असं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
महाराज मोठ्या फरकाने विजयी होतील असं वाटलं होतं…
हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे आणि संजय मंडलिक वादावरही भाष्य केलं. संजय मंडलिक यांच्या मताधिक्यावरून आरोप प्रत्यारोप करण्याची गरज नाही. मंडलिक गटाचे कार्यकर्ते तालुक्यातील गावागावात आहेत. त्यांना माहित आहे कोणी प्रामाणिकपणे काम केले. आमच्या लोकांनी काम केले की नाही हे लोकांनी पाहिलं. त्यामुळे कोणाला पुरावा देण्याची गरज नाही. महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं मला वाटत होतं. शाहू महाराज 3 लाख मतांनी निवडून येतील असं वाटलं होतं पण ते 1 लाख 48 हजार मतांनी निवडून आले, असं मुश्रीफ म्हणाले.
दादांच्यामागे ठाम राहू
दरम्यान, अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनीही कालच्या बैठकीची माहिती दिली. कोणतीही परिस्थिती आली तरी अजितदादांना सोडून जाणार नाही, असा शब्द प्रत्येक आमदारांनी अजित पवार यांना दिला आहे. प्रत्येक आमदार अजितदादांच्या पाठी ठामपणे उभं राहण्यावर ठाम आहे, असं सुनील शेळके यांनी सांगितलं.
लवकर पक्षप्रवेश करून घ्या
रोहित पवारांना सांगा त्यांच्या संपर्कात कुणी असेल तर लवकर पक्षात घ्या, आता दिवसपण थोडे राहिले आहेत. त्यांना उमेदवार शोधण्याची वेळ येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. वेगवेगळ्या कारणाने आमदार कालच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जातीपातीचं राजकारण झालं
या वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत फार बदल झाला होता. जातीपातीचे राजकारण आणि संविधानाबद्दल विरोधकांनी अपप्रचार केला. त्याचा आम्हाला फटका बसला, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम समाज दूर केल्याने फटका बसला, असा दावा सुनील शेळके यांनी केला आहे.