शबाना आझमी, नसीरुद्दीन शहाच कशाला?, मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने थेट भाजपलाच ललकारले
भाजपशासित राज्यात काही घडलं तर नसीरुद्दीन शहासह हे लोक पाहा कसं बोलतात. देशात राहण्याची भीती वाटेल. अजून एक पुरस्कार वापसी गँग आहे. ते सक्रिय होतात आणि गळा काढून ओरडत असतात. ते त्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवतात.
नवी दिल्ली: मध्यप्रदेशातील गृहमंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मध्यप्रदेशातील भाजप (bjp) सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishras) यांनी अभिनेत्री शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा यांना टुकडे टुकडे गँग म्हणून संबोधलं आहे. हे तिन्ही लोक टुकडे टुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिश्रा यांच्या या आरोपाचा काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी समाचार घेतला आहे. शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि जावेद अख्तरच कशाला? मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य आहे, असं सांगतानाच नरोत्तम मिश्रा यांच्याकडे टुकडे टुकडे गँगची अधिक माहिती दिसतेय. त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्त केलं पाहिजे, असा टोलाही पी. चिदंबरम यांनी लगावला आहे.
पी. चिदंबरम यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. मध्यप्रदेशातील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा यांना टुकडे टुकडे गँगचा सदस्य का संबोधले? मीही टुकडे टुकडे गँगचा सदस्य आहे, अशी घोषणा मी संसदेत केली होती, असं पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मिश्रा नेमकं काय म्हणाले?
नरोत्तम मिश्रा यांनी शुक्रवारी हे विधान केलं होतं. शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहा हे टुकडे टुकडे गँगच्या स्लीपर सेलचे एजंट आहेत. हे लोक केवळ भाजप शासित राज्यात झालेल्या घटनांवर आगपाखड करत असतात. काँग्रेस शासित राजस्थान आणि झारखंड सारख्या राज्यातील घटनांवर ते मौन पाळतात. राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली होती. त्यावेळी त्या (शबाना आझमी) काही बोलल्या होत्या का? आता आमच्या एका मुलीला झारखंडमध्ये जिवंत जाळलं गेलं. त्यावरही त्या काहीच बोलल्या नाहीत, असं मिश्रा म्हणाले होते.
पुरस्कार वापसी गँगही सक्रिय होते
भाजपशासित राज्यात काही घडलं तर नसीरुद्दीन शहासह हे लोक पाहा कसं बोलतात. देशात राहण्याची भीती वाटेल. अजून एक पुरस्कार वापसी गँग आहे. ते सक्रिय होतात आणि गळा काढून ओरडत असतात. ते त्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवतात. त्यांना सभ्य आणि धर्मनिरपेक्ष कसं म्हणणार? आता हे लोक उघडे पडले आहेत, असंही मिश्रा म्हणाले होते.
Why did the Home Minister of Madhya Pradesh stop with calling Shabana Azmi, Javed Akhtar & Naseeruddin Shah members of the tukde-tukde gang?
I had declared in Parliament that I was a member of the tukde-tukde gang!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 4, 2022