Farooq Abdullah : ‘पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबॉम्ब’ , फारुक अब्दुल्ला यांचं वादग्रस्त वक्तव्य
Farooq Abdullah : जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. POK भारतामध्ये विलीन होईल, असं राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर फारुक अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. फारुक अब्दुल्ला आता पाकिस्तानची भाषा बोलतायत, असं भाजपाने म्हटलय.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मीर संदर्भात वक्तव्य केलं होतं. POK भारतामध्ये विलीन होईल, असं राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पाकव्याप्त काश्मीर घेताना, पाकिस्तान गप्प बसणार नाही. त्यांच्याकडे अणूबॉम्ब आहे. त्याचा वापर ते करतील” असं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांनाच भारतामध्ये येण्याची इच्छा आहे, असं राजनाथ सिंह पीटीआयला रविवारी म्हणाले.
राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर फारुक अब्दुल्ला यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले की, “संरक्षण मंत्री जर असं म्हणत असतील, तर त्यांनी तसं करावं. आम्ही त्यांना थांबणारे कोण?. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडे अणूबॉम्ब आहे, ते त्याचा आपल्याविरोधात वापर करतील” फारुक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आता पाकिस्तानची भाषा बोलतायत, असं भाजपाने म्हटलय. इंडिया आघाडीच्या नेत्यांवर पाकिस्तानचा प्रभाव आहे असं भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले.
‘पाकिस्तानला मदत होईल असं वक्तव्य’
“आतापर्यंत पाकिस्तानातील काही कट्टरपंथीने नेते त्यांच्याकडे अणूबॉम्ब असल्याच सांगत होते. पण आता इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते फारुख अब्दुल्ला तेच म्हणतायत. भाजपाच सरकार गेलं पाहिजे असं पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी म्हणतायत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला मदत होईल असं वक्तव्य केलं” असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले.
‘इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर भाष्य केलं होतं. इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव असल्याच मोदी म्हणाले होते. भाजपासोबत एनडीएमध्ये असलेल्या राष्ट्रीय लोक दल पक्षाने फारुक अब्ब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. हे लाजिरवाणं विधान असल्याचे आरएलडीने म्हटलय.