जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही; पंकजा मुंडेंचा हल्ला कुणावर?
माझा मेळावा हा कष्टकऱ्यांचा आहे. माझ्याकडे खुर्च्या नव्हत्या. तेवढी व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही रे बाबा. खुर्च्या टाकल्या असत्या तर हा मेळावा चौपट झाला असता, असा चिमटाही त्यांनी काढला.
बीड: काहींना वाटतं दसरा मेळाव्यातून (dussehra rally) चिखलफेक केली जाते. पण माझा मेळावा हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही. तो चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे, असं सांगतानाच संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्षाशिवाय नाव मिळत नाही. तसेच जोडे उचलणाऱ्यांचेही नाव होत नाही, अशा शब्दात भाजप (bjp) नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी जोरदार हल्ला चढवला. दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावातील भक्तीगडावरून त्या जनतेशी संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी राजकीय फटकारेही लगावले.
भगवान बाबांपासून ते गोपीनाथ मुंडे सर्वांनी संघर्ष केला. चाळीस वर्षाच्या संघर्षात फक्त साडेचार वर्ष मला सत्ता मिळाली हा संघर्ष काय कमी आहे? मी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता हीच माझी प्रेरणा आहे. संघर्ष हा महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही. संघर्ष हा महत्त्वाचा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
कोणत्याही आगीतून मी नारळ बाहेर काढायला तयार आहे. मी शत्रूलाही वाईट बोलत नाही. वारसा चालवणाऱ्यांवर तरी कसं बोलणार? मी वाकणार नाही, झुकणार नाही, विकणारही नाही आणि थकणारही नाही, असंही त्या म्हणाल्या.
माझा मेळावा हा कष्टकऱ्यांचा आहे. माझ्याकडे खुर्च्या नव्हत्या. तेवढी व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही रे बाबा. खुर्च्या टाकल्या असत्या तर हा मेळावा चौपट झाला असता, असा चिमटाही त्यांनी काढला.
गर्दी हीच माझी ताकद आहे. माझा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही. हा चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वारसा चालवते. अमित शहा यांचाही वारसा चालवते, असंही त्यांनी सांगितलं.
मी नाराज नाही. माझं नाराज होण्याचं कारण नाही. कुणावर नाराज होणार? हे राजकारण आहे. होय, मी नाराज होईल. पण कुणावर? तर तुमच्यावर. तुम्ही आपल्या मेळाव्याला आला नाही तर मी जरुर नाराज होईल, असं त्या म्हणाल्या.