Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी आधी धनंजय मुंडेंच औक्षण केलं, मग म्हणाल्या…
Pankaja Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच औक्षण केलं. मग, त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. मुंडे बहिण-भावाविरोधात सर्वपक्षीय नेते बीडमध्ये एकत्र येत आहेत, त्यावरही पंकजा मुंडे बोलल्या.
परळी विधानसभा मतदारसंघातून आज धनंजय मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. 2019 साली परळीतून धनंजय मुंडे निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या आहेत. पण आता महायुतीमुळे दोघांना एकत्र यावं लागलं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. त्यानंतर माध्यमाशी बोलल्या. “महायुतीची यादी जवळपास जाहीर झाली आहे. धनंजय मुंडे यांची सूचक म्हणून बहिण म्हणून मी उपस्थित आहे. सूचक म्हणून मी सही केलेली आहे. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देते. ही निवडणूक त्यांना सोपी जावी. चांगल्या मतांनी त्यांना विजय मिळावा. या मतदारसंघात परंपरागत आमच्या परिवाराने सेवा केली आहे, तशी त्यांनी सुद्धा सेवा करत रहावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महायुतीसाठी परिस्थिती कशी आहे? या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “परिस्थिती चांगली आहे. भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. आमचा आत्मविश्वास झळकतो. आमचे महायुतीचे उमेदवार चर्चा करुन निर्णय घेत आहेत. निवडणूक सकारात्मक वाटते. नकारात्मकता नाहीय. सरकारच्या योजनांचा चांगला परिणाम आहे. कृषीपंपावर वीज बिल माफी, लाडकी बहिण असेल, मुलींची फी माफी हे सगळे लोकहिताचे निर्णय आहेत” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सर्व पक्षीय नेते मुंडे बहिण-भावाविरोधात एकत्र
“लोकसभेला फेर नरेटिव्ह तयार झालेलं. मोदी आले, तर संविधान बदलतील, तसं काही झालेलं नाही. देशात मोदी पंतप्रधान आहेत, राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार यावं, अशी लोकांची इच्छा आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीतील स्वत:च्या पराभवावर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी त्यावर पुस्तक लिहिन. त्या विषयी आता बोलण्याची गरज नाही. लोकांना विजय पथावर नेणं कर्तव्य आहे” “ही निवडणूक आम्ही दोघे मिळून, आमची टीम लढेल. कुठले प्रश्न निर्माण झाले, तर त्यावर तोडगा काढू. तुम्ही दोघे एकत्र आल्यावर सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, त्यावर येऊ द्या, लोकशाही आहे” असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.