Pankaja Munde : ‘मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा’, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; तर सदाभाऊ खोतांचा पत्ता कट होणार?
मी विधान परिषदेवर जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेवरून पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
बीड : भाजपच्या नेत्या आणि माजी जलसंपदा, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचं वक्तव्य केलंय. मी विधान परिषदेवर (Vidhan Parishad) जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा विधान परिषदेवरून पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राज्याच्या राजकारणापासून काहीसं दूर गेलेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 20 जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. अशावेळी पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असं पंकजा मुंडे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाल्या.
‘सर्व पक्षीयांना वाटते मी पदावर जावे’
पंकजा मुंडे यांनी आज नारायण गडावर भाषण केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्याकडे पद नसतानाही लोकांचा आशीर्वाद मिळेल. सर्व पक्षीयांना वाटते मी पदावर जावे. वंचित, दुःखी लोकांची वेदना पोटातून पाहावी लागते. मुंडे गेल्यानंतर आपण सर्वांनी माझी मायेने झोळी भरली. आज सत्ता आहे मात्र यात काही चांगले आणि काही वाईट आहेत. वाईट प्रवृत्तींना मान खाली घालण्यास भाग पाडले पाहिजे. चांगल्या प्रवृत्तींना विजय केला पाहिजे.
सदाभाऊ खोतांना विश्रांती मिळणार?
दुसरीकडे, सदाभाऊ खोत यांचा विधान परिषदेवरुन पत्ता कट होण्याची शक्यता आहे. खोत यांना यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी यावेळी अनेकांचं लॉबिंग सुरु आहे. अशावेळी खोत यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, एसटी कर्मचारी आंदोलनापासून सदाभाऊ खोत चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरही सदाभाऊ तोंडसुख घेताना पाहायला मिळतात. महाविकास आघाडी सरकारविरोधात सदाभाऊंची तोफ भाजपसाठी नेहमीच महत्वाची ठरली आहे. असं असतानाही सदाभाऊ खोत यांना यावेळी विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.