Dhanajay Munde | काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला
पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, यशश्री मुंडे आणि पंकजांच्या आई यांनी मुंबईत धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
मुंबई| सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री त्यांच्या भेटीला येत आहेत. धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही आवर्जून त्यांची भेट घेतली. ब्रीच कँडी रुग्णालयात आज सकाळीच त्या दाखल झाल्या. त्यांच्यासोबत पंकजांच्या आईंसह प्रीतम मुंडे आणि सर्वात लहान बहीण यशश्री मुंडे यादेखील होत्या. या तिन्ही बहिणींनी धनंजय मुंडे यांची अगत्याने भेट घेतली. तसेच एक मोठी बहीण या नात्याने पंकजा मुंडे यांनी त्यांना काही सल्लादेखील दिला. प्रकृतीची काळजी घे, जास्त दगदग करू नकोस, मी सोबत आहे. बाकी काही होत राहील, पण आधी तब्येत महत्त्वाची आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
‘हृदय विकाराचा झटका नाही’
पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि त्यांच्या मातोश्रींसह मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाऊ धनंजय मुंडे यांची आपुलकीनं चौकशी केली. धनंजय मुंडे यांना भोवळ आल्यानंतर काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांच्या सर्व टेस्ट करून झाल्या असून तो हृदय विकाराचा झटका नव्हता, असं डॉक्टरांनी स्पष्ट केल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
राजकीय शत्रूत्व सोडून बहिणींकडून भावाची चौकशी
पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. तर गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे हे धनंजय मुंडे यांचे वडील होते. राजकारणात अत्यंत महत्त्वाचे असलेले बीड जिल्ह्यातील हे घराणे आधी भाजपात होते. मात्र राजकीय नाराजीनंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही कट्टर राजकीय वैरी बनले. मात्र कौटुंबिक सुख-दुःखात ते सोबत असल्याचे दिसून आले आहे. आजदेखील धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्यानंतर पंकजा मुंडे आवर्जून त्यांच्या भेटीसाठी आल्या आणि त्यांना फार काळजी करू नकोस, मी सोबत आहे, बाकी सर्व होतच राहील, आधी तब्येत महत्त्वाची, असा सल्ला दिला.
आणखी कोण कोण भेटले?
धनंजय मुंडे यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ आदींनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील फोनवरून धनंजय मुंडे यांना तब्येतीची विचारपूस केली. तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला.
इतर बातम्या