Pankaja Munde: माझ्या नाराजीच्या बातम्या पेरू नका, सरकार स्थापनेत माझा चिमणी, उंदिर आणि मुंगीचाही वाटा नाही: पंकजा मुंडे
Pankaja Munde: माझ्या रॅली नेहमीच मोठ्या होतात. मला त्याचे कौतुक नाही. मात्र देशप्रेम भरभरून दिसून आले याचे समाधान आहे. ओबीसी, मराठा आरक्षणासाठी मी लढणार आणि महिलांसाठीही मी लढणार आहे. मंत्री मंडळात महिलांना स्थान देतील अशी मला अपेक्षा आहे.
परळी: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना शिंदे-फडणवीस सराकरमध्ये (maharashtra government) स्थान मिळाले नाही. या सरकारच्या विस्तारावेळी (cabinet expansion) पंकजा मुंडे उपस्थितही नव्हत्या. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच माझी पात्रता वाटत नसेल म्हणून त्यांनी मला मंत्रिपदाची संधी दिल नसावी असं सांगून पंकजा मुंडे यांनी पक्षावर हल्ला चढवला होता. त्यामुळे पंकजा या नाराज असल्याच्या चर्चांना अधिकच हवा मिळाली होती. त्यानंतर पंकजा यांनी आपण नाराज नाही. माझ्या नाराजीच्या बातम्या पेरू नका, असं स्पष्ट केलं. मात्र, हे सांगताना माझे कार्यकर्ते नाराज आहेत, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून पंकजा मुंडे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. याशिवाय पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय चाललंय? अशी चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज परळीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या. माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, माझ्या नाराजीच्या बातम्या पेरू नका. मी नाराज नाही. पण कोणत्या कार्यकर्त्याला वाटत नाही की त्यांचा नेता मोठं व्हावा. प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता नाराज होतच असतो. मी माझी ताकद नेहमीच पक्षाला दिली. आज माझ्याकडे काही नाही. लोकांना वाटलं माझी ताकद कमी झाली. त्यामुळे लोक माझ्या पाठीशी आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
खोटं श्रेय घेणार नाही
राज्यातील सत्ता स्थापनेत माझा चिमणीचा,उंदराचा, मुंगी एवढा देखील वाटा नाही. माझा काहीही रोल नाही. मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. सत्ता स्थापन झाल्याचा आनंद आहे. मात्र मी खोटं श्रेय घेणार नाही. मंत्री मंडळ विस्तारात बीडबद्दल प्रदेश अध्यक्ष आणि प्रवक्ते ठरवतील. माझा का समावेश केला नाही मला माहीत नाही. मी काही यादी तयार केली नाही. त्या प्रक्रियेत मी नाही, असंही त्या म्हणाल्या.
परली देखो, परली में बहोत कठीण है
माझ्या रॅली नेहमीच मोठ्या होतात. मला त्याचे कौतुक नाही. मात्र देशप्रेम भरभरून दिसून आले याचे समाधान आहे. ओबीसी, मराठा आरक्षणासाठी मी लढणार आणि महिलांसाठीही मी लढणार आहे. मंत्री मंडळात महिलांना स्थान देतील अशी मला अपेक्षा आहे. तशी माझी इच्छा आहे आणि सक्त मागणी देखील आहे. सरकारमध्ये मंत्री असताना माझ्यावर आरोप झाले. तिथं मला संघर्ष करावा लागला. मंत्री झाल्यावर एक दिवस देखील सुखाचा गेला नाही. संघर्ष हा व्यक्ती विरुद्ध नाही तर प्रवृत्तीविरुद्ध आहे. लोकांना अभ्यास नाही, मला म्हणतात परली देखो, परली में बहोत कठीण है, अशी टीका त्यांनी केली.