सुजय विखेंच्या प्रचाराला मी नगरमध्ये जाईन : पंकजा मुंडे
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सागंतिले […]
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सागंतिले की, सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मी स्वत: अहमदनगरमध्ये जाईन.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना खूप प्रेम दिलं. तीन पिढ्यांचे आमचे संबंध आहेत. त्यामुळे सुजय विखे यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये मी जाईन. नगरची जागा चांगल्या मताधिक्क्याने निवडून येईल.”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तसेच, भाजप आणि शिवसेना युतीच्या जागा गेल्या वेळेपेक्षा यंदा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुजय विखे भाजपमध्ये!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने थेट विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनाच पक्षात घेऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं आणि 12 मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.