Parbhani | तिघांचे घ्या, अन् चौथ्याला मतदान करा, परभणीत आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्यानं खळबळ…
रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश होता त्यावेळी ते गंगाखेड येथे आयोजित सभेत बोलत होते. खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात. त्यांनी जनतेला लुटलेलच असते, असेही रत्नाकर गुट्टे म्हणाले.
परभणीः हिंगोलीतल्या बबनराव थोरातांच्या (Babanrao Thorat) वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक झालेली असतानाच आता परभणीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या (MLA Ratnakar Gutte) एका वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या (Parbhani ZP Election) पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. विविध कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. अशाच एका कार्यक्रमात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत समजा चार उमेदवार असतील तर तिघांचे (पैसे) घ्या आणि चौथ्याला मतदान करा, असं वक्तव्य त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर खर्च करणाऱ्या उमेदवारांनी हे पैसे काही मेहनतीने कमावलेले नसतात तर ते जनतेलाच लुटलेलं असतं असंही आमदार म्हणाले. परभणीच्या राजकीय वर्तुळात सध्या या वक्तव्यानं खळबळ माजली आहे.
रत्नाकर गुट्टेंचं वक्तव्य काय?
निवडणुकांची रणधुमाळीच्या तोंडावर आता नेत्यांचे वादग्रस्त विधाने समोर येत आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी निवडणुकीत तिघांचे पैसे घ्या अन् चवथ्याला मतदान करा ,असे मतदारांना आवाहन करून एकच खळबळ उडवून दिली आहे. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात काही कार्यकर्त्यांचा प्रवेश होता त्यावेळी ते गंगाखेड येथे आयोजित सभेत बोलत होते. खर्च करणारे उमेदवार यांनी नांगर हाणून पैसे आणलेले नसतात. त्यांनी जनतेला लुटलेलच असते. त्यामुळे त्यांना आपल्याला लुटायला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन उमेदवारांचे पैसे घेऊन चौथ्या उमेदवाराला मतदान करा असे वादग्रस्त विधान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.
Parbhani | तिघांचे घ्या, अन् चौथ्याला मतदान करा, आमदार रत्नाकर गुट्टेंच्या वक्तव्यानं खळबळ… pic.twitter.com/VTZ5QWZYkx
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 4, 2022
हिंगोलीच्या बबनराव थोरातांवर कारवाई
हिंगोली मतदार संघात शिवसेना नेते बबनराव थोरात यांनीदेखील वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मराठवाड्यात खळबळ माजली होती. गद्दारांच्या गाड्या फोडा. जो पहिली गाडी फोडेल, त्याचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, असं वक्तव्य त्यांनी हिंगोलीतील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. राज्यभरातून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बंडखोर आमदारांनीही या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबईत बबनराव थोरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना 5 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. आता परभणीत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.