मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (12 ऑगस्ट) प्रसारमाध्यमांसमोर त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेवर पार्थ पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनवर प्रतिक्रिया दिली आहे (Parth Pawar first reaction on Sharad pawar criticize).
“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही” असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यावर पार्थ पावारांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला (Parth Pawar first reaction on Sharad pawar criticize).
हेही वाचा : पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”.
पार्थ पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती.
“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आपल्या ट्वीटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं.
याआधी, पार्थ पवार तरुण आहेत, नवीन आहेत, त्यांना अनुभव कमी आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. पण त्यामुळे काही मतभेद होणार नसल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली होती.
पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
हेही वाचा : पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण
पहिली भूमिका
पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते.
दुसरी भूमिका
“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
शरद पवार यांच्या वक्तव्याने निर्माण झालेले प्रश्न
पार्थ पवारांना कवडीची किंमत नाही, असं शरद पवार का म्हणाले ?
पवार जर CBI चौकशीच्या बाजूने, मग पार्थवर आगपाखड का ?
अजितदादा आणि शरद पवारांना न विचारताच पार्थ भूमिका घेत आहेत का ?
आधी CBI मागणी, नंतर राम मंदिराला शुभेच्छा दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी ?
पार्थ पवारांवरुन आता राष्ट्रवादीतले मतभेद उघड होत आहेत का ?
पवारांच्या मनात पार्थ इमॅच्युअर आहे तर मग लोकसभेची तिकीट कशी दिली ?
पार्थ पवार यांचा परिचय
पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.