पवार घराण्यातील चौथी पिढी, पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग; जाणून घ्या रोहित पवारांबद्दल

| Updated on: Apr 19, 2021 | 6:22 PM

आमदार रोहित पवार यांच्या रुपाने पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात आली आहे. (pawar family's fourth generation enters in politics, know about rohit pawar)

पवार घराण्यातील चौथी पिढी, पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग; जाणून घ्या रोहित पवारांबद्दल
rohit pawar
Follow us on

मुंबई: आमदार रोहित पवार यांच्या रुपाने पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात आली आहे. लोकांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांच्या समस्या तातडीने सोडवणं, सतत लोकांच्या संपर्कात राहणं याबरोबरच संयम, विनम्रता आणि अभ्यासूपणा… हा राजकारणात टिकून राहण्याचा महत्त्वाचा खजिना आहे. पवारांच्या तीन पिढ्यांनी जपलेला हा खजिना रोहित पवार यांच्याकडे आला आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि बोलण्यातून तो नेहमी दिसत असतो. कर्जत-जामखेडमध्ये कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून नुसतेच ते जायंट किलर ठरले नाहीत, तर भाजपच्या 25 वर्षांपासूनच्या अभेद्य गडाला सुरुंग लावणारे तरुण नेतेही ठरले आहेत. (pawar family’s fourth generation enters in politics, know about rohit pawar)

बारामती, पुणे आणि मुंबईत शिक्षण

घरची परिस्थिती पाहता रोहित पवार यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य होतं. मात्र, त्यांचं पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याच निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारुन व्यवसायात सक्रीय झाले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करीत रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो या आपल्या कंपनीला राज्यात नव्हे देशात एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. रोहित पवारांच्या या यशस्वी व्यावसायिकतेलाच जोड मिळाली ती समाजकार्याची.

जिल्हा परिषदेपासून सुरुवात

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.

नेतृत्व सिद्ध केलं

शरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल अवघ्या महाराष्ट्राला असते. शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. मात्र, आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? तर दोन नावं प्रामुख्याने समोर येतात, एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार. यातील पार्थ पवार तर अद्याप राजकारणात म्हणावे तसे सक्रीय झाले नाहीत. अर्थात त्यांच्याकडे कोणतंही पद नसल्यानेही असू शकेल. मात्र रोहित पवार हे नुसते सक्रीय झाले नाहीत, तर आपलं नेतृत्त्वही त्यांनी सिद्ध केले आहे.

राम शिंदेंना पराभूत केलं

राज्यात 2019 ची विधनासभा निवडणूक विशेष चर्चेत राहिली. त्यातही कर्जत-जामखेडची निवडणूक लक्ष्यवेधी ठरली. या निवडणुकीत रोहित यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि मातब्बर मंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून सलग इथे भाजपाचा उमेदवार निवडून येत होता. भाजपच्या अशा या मजबूत गडाला 34 वर्षे वयाच्या या तरुणाने जोरदार तडा दिला. रोहित पवारांनी 25 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गडाला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला ; वास्तविक पाहता रोहित दादांनी सेफ मतदारसंघ सोडून कर्जत-जामखेड सारखा तुलनेनं अवघड मतदारसंघ जाणीवपूर्वक निवडला आणि प्रचंड ताकदीने लढून जिंकूनही दाखवला.

शरद पवार आणि अजित पवारांशी नातं काय?

रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.

शेती क्षेत्रात ठसा उमटवला

रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इथवर एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. मात्र, नात्या-गोत्याच्या पलिकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं कळत नाही, ही गृहितकं मोडीत काढून, रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

‘सृजन’ उपक्रम

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित यांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ‘सृजन’ हा उपक्रम त्यातीलच एक. ‘सृजन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजनही ते करत असतात.

कोरोना काळात मदतीचा हात

कोरोनाच्या काळात रोहित पवार यांनी स्वतःच्या कर्जत जामखेड या मतदारसंघापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात लोकसेवेसाठी अक्षरशः झोकून दिले. त्यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात अत्याधुनिक कोव्हिड सेंटरची उभारणी केली. 2018-19 या वर्षातील 1 लाख 48 हजार शेतकऱ्यांना 140 कोटी रुपयांचा प्रलंबित विमा मिळवून दिला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ‘माझे गाव माझी शाळा’ हा उपक्रम राबवला. राज्यभरात विविध सरकारी आस्थापनांमध्ये सॅनिटायझरचे वाटप केले. कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात 5 ट्रक धान्य उपलब्ध करून दिलं.

आणि त्या मुलींना शिक्षण मिळाले

2015 मध्ये मराठवाड्यातील शेतीतील दुष्काळी स्थितीत मुलींचे शिक्षण बंद होण्याची माहिती मिळताच त्यांनी कोणत्याही स्थितीत मराठवाड्यातील आपल्या बहिणींचे शिक्षण बंद होणार नाही असे सांगत मुलींच्या निवास व भोजनाच्या व्यवस्थेसाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला. त्यानंतर त्यांनी जनमाणसांत, गावोगावी जाऊन अडचणी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातूनच शाश्वत विकास घडू शकतो यावर विश्वास असलेल्या रोहित पवार यांनी प्रत्येक कामात लोकसहभागावर भर दिला, त्यातून काही माणसं भेटली व काही जोडत गेली. तो प्रवास आजही तसाच चालू आहे.

दुष्काळ निवारणासाठी पुढाकार

सततच्या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण हा एक पर्याय जवळचा व योग्य असल्याचे रोहित पवार यांनी जाणले आणि त्यातून त्यांनी या प्रश्नावर व्यापक काम करण्याचा निर्णय घेतला. कोणते एखादे गाव निवडून तेथे हा प्रश्न सोडवून ते इतरांना त्यांना दाखवता आले असते, मात्र कित्येक गावे दुष्काळाशी लढत आहेत, त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, फक्त लोकसहभागाची अट ठेवली. नगर जिल्ह्यातील जामखेड-कर्जत, बीड तसेच माण-खटाव तालुक्याच्या काही भागात पाण्याच्या टॅंकरचा अखंडीत पुरवठा या कंपनीने केला. अर्थात या तीनच ठिकाणी नव्हे तर इतरही ठिकाणी मागणीनुसार बारामती अॅग्रोमार्फत लोकांना पाणी पुरवले. हे पाणी पुरवतानाही ते शुध्द असेल याची खबरदारी बारामती अॅग्रोने घेतली. त्यामुळे ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्याची समस्या झेलणाऱ्या अनेक गावांना पिण्याचे पाणी तेही शुध्द स्वरुपात मिळण्यास मदत झाली व या गावांना दिलासा मिळाला.

एक डबा संवेदनांचा

घरची स्थिती बदलण्याचा इरादा बाळगून मराठवाडा, विदर्भातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षातील दुष्काळाच्या झळांनी त्रस्त केले. अगदी भोजन व्यवस्थेचीही भ्रांत निर्माण झाली, रोहित पवार यांच्या कानावर मित्रांकडून माहिती जाताच त्यांनी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था सुरू केली. ही मदत नव्हती, तर संवेदना आणि जाणीवेतून करण्यात आलेले मोठ्या भावाचे इतिकर्तव्य होते. (pawar family’s fourth generation enters in politics, know about rohit pawar)

रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं:

1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद)
3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
4. संचालक, आयएसईसी
5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट
6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया (pawar family’s fourth generation enters in politics, know about rohit pawar)

 

संबंधित बातम्या:

रिक्षाचालक ते नगरविकास मंत्री; वाचा, ‘ठाणे’दार एकनाथ शिंदेंचा प्रवास

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

संघर्षशील नेता, कामगारांचा बुलंद आवाज; वाचा, कोण आहेत भाई जगताप?

(pawar family’s fourth generation enters in politics, know about rohit pawar)