चिंचवडमध्ये मोठा ट्विस्ट, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नाव बदललं, घोषणा होताच बंडखोरी उफाळली, कोण आहेत नाना काटे?
चिंचवड येथील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. त्यामुळे अजित पवार यांचं टेंशन वाढल्याचं म्हटलं जात होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांना राहुल कलाटे यांची समजूत काढण्यासाठी पाठवण्यात आलं आहे.
योगेश बोरसे, पुणेः पिंपरी चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) या ठिकाणी राहुल कलाटे (Rahul Kalate) हे निवडणूक लढवतील, असं कालपर्यंत म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात जाहीर घोषणा करण्यात आली नव्हती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय बैठकांनंतर नाना काटे यांचं नाव समोर आलं. नाना काटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नाना काटे समर्थकांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. काही वेळातच ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कोण आहेत नाना काटे?
- नाना काटे 2007 सालापासून पिंपळे सौदागर भागातून नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत एकनिष्ठ आणि अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची राजकीय ओळख आहे.
- चिंचवड विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे
- २०१४ साली चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली.
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दिल्यानंतर नाना काटे घरातून बाहेर पडले. सर्वात आधी महादेव मंदिरात दर्शन घेऊन, त्यानंतर मोठं शक्ति प्रदर्शन करत ते अर्ज भरायला निघाले.
नाना काटेंना उमेदवारी का?
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवार नको, आयात उमेदवार दिला तर पक्षाचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे राहुल कलाटे यांच्या उमेदवारीला विरोध झाला आणि नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
राहुल कलाटेंची बंडखोरी
कालपर्यंत उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या राहुल कलाटे यांनी मात्र पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्याची भूमिका जाहीर केली. राहुल कलाटे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून शक्तिप्रदर्शनही केलं.
समजूत काढण्याचा प्रयत्न
चिंचवड येथील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. त्यामुळे अजित पवार यांचं टेंशन वाढल्याचं म्हटलं जात होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांना राहुल कलाटे यांची समजूत काढण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. या दोघांमध्ये बंद दारा आड चर्चा सुरु आहे. त्यानंतर राहुल कलाटे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
भाजपकडून कोण?
पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महाविकास आघाडीने नकार दिला आहे. त्यामुळे अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.