‘महेश लांडगे, लक्ष्मण जगतापांच्या अनेक चुका, भाजपला फटका बसण्याची शक्यता’, भाजप नगरसेवकाचं थेट फडणवीसांना पत्र
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत रणशिंग फुंकलं आहे. त्यावेळी त्यांनी ज्या पक्षाने शहराची उभारणी केली, त्या पक्षाला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन पवारांनी केलंय. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय. (BJP corporator Tushar Kamthe’s letter to Devendra Fadnavis)
भाजप नगरसेवकाचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र
‘उपरोक्त विषयान्वये मी तुषार कामठे (नगरसेवक पिं. चिं. मनपा) आपणास विनंती करू इच्छितो की, येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये शहरातील भाजपचे दोन आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे’.
‘भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावं’
‘या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. तरी आपण येत्या महापालिका निवडणुक तिकीट वाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी आपणास विनंती’.
‘आमदार चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्यागही करतील’
‘राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. ज्या दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील परंतु नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही. तरी माझ्या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती’.
फडणवीस दखल घेणार का?
महापालिका निवडणुकीसाठी एकीकडी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोर लावला आहे. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांमध्ये नाराजी आणि गटबाजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या :
आर्यन खानचं काऊन्सिलिंग केल्याच्या वावड्या की सत्य? मलिक म्हणतात, व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवा
पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, आता नवाब मलिक म्हणतात पाय घसरू देऊ नका!
BJP corporator Tushar Kamthe’s letter to Devendra Fadnavis