PM Modi In Pune: पुण्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ना आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजेरी लावणार, कारण काय?
पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (6 मार्च) पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्याऐवजी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हजेरी लावतील. तर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे मागील दोन तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री अनेक महत्वाचा कार्यक्रमांना, बैठकांना अनुपस्थित राहिले. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य होत नसल्यामुळे ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत. अशावेळी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
कसा असेल पंतप्रधान मोदींचा पुण्यातील कार्यक्रम?
1. पंतप्रधान मोदी आज 5 तास पुण्या दौऱ्यावर 2. सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन 3. सकाळी 11 वाजता पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण 4. सकाळी 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन, गरवारे स्टेशन (पंतप्रधान मेट्रोने प्रवास करणार) 5. 12 वाजता एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन, त्यानंतर जाहीर सभा 6. 1.45 वाजता, सिम्बाय़सिस, आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन 7. 3 वाजता पुण्याहून रवाना होणार
मोदींच्या पुणे दौऱ्यावर शरद पवारांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केलीय. ‘देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही कार्यक्रम होत असतील तर तक्रार करण्याचे कारण नाही. एक महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. तेव्हा मेट्रोचे काम पूर्ण झाले नसल्याचे लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाट होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही’, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन टीका केली आहे.
इतर बातम्या :