Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. या आधाही महाराष्ट्रातील परस्पर विरोधी विचारांच्या नेत्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे.

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!
political leader
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 10:28 PM

भीमराव गवळी, टीव्ही9 मराठी, मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. या आधाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट… विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची घेतलेली भेट आणि पवारांनी मधल्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली कथित भेट… यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. एका राजकीय भेटीचे राजकीय अर्थ काढले जात नाही तोच दुसऱ्या राजकीय भेटीचं वृत्त येऊन धडकत आहे. त्यामुळे नव्या समीकरणाची पुन्हा पुन्हा चर्चा होताना दिसत आहे. या भेटीगाठींमागील नेमकी कारणं काय आहेत? पडद्यामागे नक्की काय सुरू आहे? याचा घेतलेला हा आढावा. (pm modi-uddhav meeting, sharad pawar-prashant kishor meeting, Massive speculation in maharashtra politics)

1) पवार-प्रशांत किशोर यांची सदिच्छा भेट; पण साडेतीन तास खल

कुणाच्या ध्यानीमनी नसतानाच आज राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या घरी या दोघांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. दुपारचं जेवण घेत या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलावून घेतलं होतं. ते पाऊणतास या बैठकीत होते. ते गेल्यानंतरही पवार-प्रशांत किशोर यांच्यात चर्चा सुरू होती. या भेटीत 2024ची लोकसभा निवडणूक, देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील फॅक्टर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोट बांधणे, बंगाल मॉडेल आणि मविआ मॉडेल देशभर लागू करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत किशोर यांनी एनसीपीसाठी काम करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पवार पारंपारिक राजकारण सोडायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली नाही. मात्र, बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केलेले दावे आणि ममता बॅनर्जींसाठी आखलेली रणनीती यामुळे ममतादीदींना मोठं यश आलं. त्याची देशभर चर्चा झाल्याने प्रशांत किशोर कोणतीही लाट परतवून लावू शकतात, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळेच पवारांनी आज प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली असावी असं सांगितलं जात आहे. अर्धा तास ही बैठक चालेल असं वाटत असताना बैठक साडे तीन तास चालली. एवढंच नव्हे तर पवारांनी थेट किशोर यांच्यासोबत दुपारचं जेवण घेत, जेवणाच्या टेबलवरही त्यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी नंबर वन होण्यापासून ते सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात प्रमोट करण्यापासून ते तिसऱ्या आघाडीचं भवितव्य, तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा, काँग्रेस आणि राहुल गांधींचं भवितव्य, डावे पक्ष, नितीश कुमार आदी विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. प्रशांत किशोर यांनी यापुढे राजकीय रणनीती आखण्याचं काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भाजपला डॅमेज करण्याची संधी ते सोडणार नाहीत. पवारांसारख्या नेत्याला भाजपला डॅमेज करण्याचे तंत्र सांगण्यासाठी तर ते सिल्व्हर ओकला आले नव्हते ना?, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

2) मुख्यमंत्री-मोदींचे ‘बंददाराआड’ खलबतं

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने मोदींशी पावणे दोन तास चर्चा केली. या पावणे दोन तासातील अर्धा तास मोदी-ठाकरे यांची बंददाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना या एकांतातील भेटीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी मोदींनाच भेटायला गेलो होतो. नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं उत्तर ठाकरेंनी दिलं. मोदी आणि आमचं नातं घट्ट असल्याचंही ते म्हणाले. त्यातून त्यांना जो राजकीय संकेत द्यायचा तो त्यांनी दिला. पण मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीत कशावर चर्चा झाली हे मात्र त्यांनी अजिबात कळू दिलं नाही. या भेटीत मोदींनी उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यावर अधिक भर दिल्याचं बोललं जात आहे. या भेटीबाबत बरेच कयास लावले जात आहेत. मात्र, ठोस असं काही बोललं जात नाही. परंतु, आगामी काळात देशात आणि राज्यात राजकीय घटना घडामोडी जसजशा घडतील तेव्हाच या अर्ध्या तासाच्या भेटीचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

3) कटुता दूर करणारी पवार-फडणवीस भेट

31 मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सिल्व्हर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तशी माहितीही त्यांनी ट्विटरवर दिली होती. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी अर्धा तास चर्चा झाल्याचं बोललं जातं. या भेटीवरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, पवारांशी संबंध सुधारण्यासाठी फडणवीसांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर फडणवीसांनीच पवारांना थेट लक्ष्य केलं होतं. एवढंच नव्हे तर फडणवीसांनी पवारांचं राजकारण संपलं असल्याचं विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतरही फडणवीसांनी पवारांनाच लक्ष्य केलं होतं. या प्रकरणात पवारांचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांनी पवारांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे फडणवीस आणि पवारांमध्ये कटुता आली होती. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेत फडणवीसांना कोरोना झाला होता. त्यामुळे ते अॅडमिट होते. तेव्हा पवारांनी फडणवीसांना स्वत:हून फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. काही दिवसांपूर्वी पवारांवरही शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे फडणवीसांनी हेच निमित्त साधून त्यांची भेट घेतली. पवारांसोबतचे संबंध सुधारण्यासाठीचं फडणवीसांचं हे पाऊल होतं, असं सांगितलं जातं. या भेटीनंतर फडणवीसांनी पवारांवर वैयक्तिक टीका केलेली नाही हे विशेष.

4) चर्चेचं गुऱ्हाळ उडवणारी पवार-शहांची भेट

दोन महिन्यांपूर्वी शरद पवार आणि अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याचं गुजरातच्या वर्तमानपत्रानं दिलं होतं. ही गुप्त बैठक होती, असंही त्यात म्हटलं होतं. त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली होती. पवार आता काय मास्टर स्ट्रोक मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीने अशा प्रकारची भेटच झाली नसल्याचं सांगत भेटीचं वृत्त फेटाळून लावलं होतं. पण अमित शहांनी संदिग्ध विधान करून या भेटीच्या चर्चांना फोडणी दिली होती. या भेटीचा तपशीलही गुलदस्त्यातच राहिला होता. मात्र, शिवसेनेवर दबाव ठेवण्यासाठी पवारांचं हे डॅमेज कंट्रोलचं राजकारण असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, या भेटीनंतर अचानक महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पवारांवर वैयक्तिक हल्ले चढवणं बंद केलं होतं. त्यामुळे या भेटीचं गूढ अधिकच वाढलं होतं.

5) खडसेंनीही गाठलं ‘सिल्व्हरओक’

देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जळगावात दाखल झाले. जळगावात ते थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. फडणवीस सुमारे अर्धा तास खडसेंच्या घरी होते. त्यावेळी खडसे मुंबईत होते. यावेळी फडणवीसांनी खासदार रक्षा खडसे यांच्याशी पक्षबांधणी संदर्भात चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच खडसे यांनी मुंबईत पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करून पक्ष बांधणीबाबत चर्चा केल्याचं समजतं. या भेटीनंतर खडसे यांनी ही राजकीय भेट नव्हती, असं माध्यमांना सांगितलं. मात्र, एक नेता जेव्हा दुसऱ्या नेत्याला भेटतो, तेव्हा त्यात काही तरी राजकीय घडत असतंच. त्यामुळे खडसेंच्या या भेटीचीही चर्चा रंगली नसती तर नवलच.

6) राऊतांकडून मोदींची स्तुती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. त्यातही मोदी-ठाकरे यांच्यात अर्धातास बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर रोज मोदींवर उठता-बसता टीका करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांचा नूर बदलला. राऊतांना अचानक मोदी प्रेमाचे भरते आले. मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. ते भाजपचा चेहरा असून त्यांच्यामुळेच भाजपला सत्ता मिळाल्याचं सांगत त्यांनी मोदींच्या नेतृत्व गुणांची स्तुती केली. तसेच जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. विशेष म्हणजे राऊत प्रत्येक विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. तसेच एखाद्या विषयावर उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असू शकते हे त्यांना बरोबर माहीत असते. त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येणार नाहीत, याची काळजी घेतच ते प्रतिक्रिया देत असतात. किंबहुना ते उद्धव ठाकरेंच्या मनातलंच बोलत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे मोदींना भेटताच राऊतांनी इकडे लगेचच मोदींची स्तुती सुरू केली. राऊतांचं अचानक बदलेलं हे रुप पाहून अनेकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. पण राऊतांच्या या मोदी प्रेमामागे अनेक अर्थ दडले असल्याचं सांगितंल जात आहे. शिवसेनेलाही भाजपबरोबरचे संबंध अधिक ताणायचे नाहीत. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना भाजपचा अडथळा येऊ नये म्हणूनही राऊत यांच्या मोदी स्तुतीकडे पाहिले जात असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

7) शिवसेना विश्वास असणारा पक्ष, जाळं की आणखी काही?

मोदी-ठाकरे यांच्या बंददाराआडील भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात असताना शरद पवारांनी मोठं विधान केलं. शिवसेना हा सर्वात विश्वास असणारा पक्ष आहे, असं सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींना कशी साथ दिली होती याचा दाखलाही त्यांनी दिला. कोणतंही कारण नसताना, आघाडीत ताणतणाव असल्याचं काहीही चित्रं नसताना पवाारांनी शिवसेनेला अचानक विश्वास असणारा पक्ष असल्याचं सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मोदी भेटीनंतर शिवसेनेत चुळबुळ होऊ नये आणि शिवसेनेने दगाबाजी करू नये म्हणून तर पवारांनी प्रमाणिकपणाच्या सर्टिफिकेटचं जाळं शिवसेने भोवती फेकलं नाही ना? असा कयासही या निमित्ताने लावला जात आहे. राज्यासह देशात होऊ घातलेला संभाव्य भूकंप हेरण्यात आणि तो रोखण्यात पवारांची हातोटी आहे. मोदी-ठाकरे भेटीने ठिणगी पेटू शकते, याची जाणीव झाल्यानेच पवारांनी शिवसेनेला कुरवाळण्याचा प्रयत्न केला असावा, असं बोललं जात आहे. तर मधल्या काळात पवार-शहा भेटीच्या वावड्या उडवण्यात आल्या होत्या. त्यातून डॅमेज कंट्रोलचं राजकारण करण्यात आलं. त्याचप्रकारे ठाकरेंनी मोदींशी बंददाराआड चर्चा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर डॅमेज कंट्रोलचं राजकारण तर केलं नाही ना?, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

8) वाघासोबतही जाऊ, मग पिंजऱ्यात या!

मोदी-ठाकरे भेटीनंतर संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर डरकाळी फोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यातून एकमेकांना इशारे देण्यापेक्षा युतीचीच खुली ऑफर देण्यात येत आहे. दोन्ही पक्षांचा एकत्र येण्यासाठी संवाद वाढावा या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये सुरू असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं पाटील म्हणाले होते. त्यावर वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं राऊत म्हणाले होते. तेव्हा, आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही, असं चंद्रकांतदादांनी उत्तर दिलं होतं. तर, राऊत यांनी शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं खुल्लं आवतन पाटील यांना दिलं होतं. या सर्व प्रतिक्रियेतून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका कमी, एकत्र येण्यावरच अधिक भर दिल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे मोदी-ठाकरे भेटीनंतरच्या या प्रतिक्रिया असल्याने त्यावर अनेक कयास लगावले जात आहेत.

9) यूपीएचा अध्यक्ष कोण? पवार की ममता?

मधल्या काळात यूपीएचा अध्यक्ष बदलण्याची चर्चा होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने यूपीएचं अध्यक्षपद इतरांकडे देण्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळी शिवसेनेने शरद पवार यांच्याकडे यूपीएचं अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. त्यावरून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी या बड्या नेत्या म्हणून पुढे आल्या आहेत. त्यांनी एकहाती बंगालची सत्ता राखली आहे. शिवाय मोदींच्या स्पर्धक म्हणूनही त्यांची इमेज तयार झाली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडे यूपीएचं अध्यक्षपद देण्याची चर्चा होत आहे. बंगाल निवडणुकीनंतर यूपीएची बैठक झाली नाही. बैठक झाल्यावरच यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडणार आहे.

10) संभाजीराजे-आंबेडकर भेट, पुन्हा सोशल इंजिनीयरिंग?

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा केला. या भेटीत ते घटनातज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा तरुणांना भेटले, त्यांच्या भावना आणि मते जाणून घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भेटले. मात्र, यातील त्यांची एक भेट अत्यंत लक्ष्यवेधी ठरली. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसोबतची. संभाजीराजे सर्वात शेवटी आंबेडकरांना पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेटले. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली. तसेच सामाजिक समता प्रस्थापित करण्यावर भर देण्यावरही चर्चा केली.

त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संभाजीराजे यांची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जात होती. आंबेडकरांना भेटण्याची आधीपासूनच इच्छा होती. आज प्रत्यक्ष भेट झाल्याचं सांगतानाच शाहू महाराज आणि बाबासाहेब एकत्र येऊ शकतात तर प्रकाश आंबेडकर आणि मी का एकत्र येऊ शकत नाही?, असा सवाल संभाजीराजेंनी केला. त्याच पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही. त्यामुळे राजेंनी पुढाकार घ्यावा, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, असं मोठं विधान आंबेडकरांनी केलं. त्यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचे कयास वर्तवले जात आहेत. प्रकाश आंबेडकर सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग राबवण्यात वाकबगार आहेत. अकोला पॅटर्न, धनगर समाजाला सोबत घेणं असो, वंचितचा प्रयोग, एमआयएम सोबत युती, डाव्यांसोबतचा प्रयोग असे अनेक प्रयोग आंबेडकरांनी केले आहेत. संभाजीराजे आणि ते एकत्र आल्यास राज्यातील हे सर्वात मोठं सोशल इंजिनीयरिंग असणार असून या प्रयोगाने केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक संदर्भही बदलू शकतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे. (pm modi-uddhav meeting, sharad pawar-prashant kishor meeting, Massive speculation in maharashtra politics)

संबंधित बातम्या:

आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांची डरकाळी

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

(pm modi-uddhav meeting, sharad pawar-prashant kishor meeting, Massive speculation in maharashtra politics)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.