मोदी हिंदुत्वावर बोलताच संसदेत ‘झूठ बोले कौआ काटे’चा नारा; विरोधी पक्षाच्या खासदारांनी बोंब ठोकली
महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. गेल्या विधानसभेत या तीन राज्यात आम्हाला जेवढे मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत आम्हाला या तीन राज्यात त्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. पंजाबमध्येही आमची अभूतपूर्व कामगिरी राहिली आहे. लोकांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
संसदेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होताच विरोधकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सभागृहात प्रचंड गदारोळ केला. यावेळी विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतलं. त्यामुळे मोदींनाही भाषण करणं मुश्किल झालं. मोदींनी कानाला हेडफोन लावून भाष्य केलं. पण विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. मोदींनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करताना काँग्रेसचा पर्दाफाशही केला. जेव्हा मोदी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलायला लागले, तेव्हा विरोधकांना झूठ बोले कौआ काटे म्हणत जोरजोरात बोंब ठोकली. विरोधकांच्या वारंवार या घोषणा सुरूच होत्या.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले होते. तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर सभागृहात बोलण्याचा नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच प्रसंग होता. मोदी बोलण्यास उभे राहताच विरोधकांनी एकच गोंधळ सुरू केला. मणिपूरच्या हिंसेवर बोला, असा आग्रहच विरोधकांनी धरला. ‘नही चलेगी नही, चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘नही चलेगी नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी’, ‘मणिपूर के लिए शेम शेम’, अशा घोषणा विरोधकांनी द्यायला सुरुवात केली. मणिपूरवर बोलण्याचा आग्रही विरोधकांनी धरला. पण मोदींनी त्याविषयावर एक शब्दही काढला नाही. त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीची चिरफाड केली.
हा हिंदूंचा अपमान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा काढला होता. या मुद्द्यावरून मोदींनी राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडून हिंदूंना हिंसक म्हटलं गेलं. हा हिंदूंचा अपमान आहे. राजकारणासाठी राहुल गांधी हिंदूंची चेष्टा करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायला लागले. त्यावेळी विरोधकांनी झूठ बोले कौआ काटे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधक वारंवार झूठ बोले कौआ काटे म्हणत होते. तसेच बंद करो, बंद करो अशा घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र मोदी यांनीही आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं.
हिंदूचा अपमान सहन करणार नाही
काँग्रेसचे साथीदार हिंदूंची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात. हिंदूंच्या बदनामीचा हा पूर्वनियोजित कट आहे. हिंदूना हिणवलं हेच का तुमचे संस्कार? हिंदू सहनशील आहेत म्हणून भारताची लोकशाही जिवंत आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराच मोदींनी यावेळी दिला.
हार स्वीकारा
2024च्या निवडणुकीत काँग्रेससाठीही लोकांनी कौल दिला आहे. जनतेचा कौल हा आहे की, तुम्ही तिथेच बसा. विरोधातच बसा. आणि ओरडत बसा. सलग तीनवेळा काँग्रेस 100 चा आकडा पार करू शकली नाही, ही काँग्रेसच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. काँग्रेसच्या इतिहासातील त्यांची ही तिसरी सर्वात मोठी हार आहे. तिसरं सर्वात वाईट प्रदर्शन आहे. काँग्रेसने आपला पराभव स्वीकार केला असता, जनतेचा आशीर्वाद स्वीकारला असता. आणि मंथन केलं असतं, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण हे तर शीर्षासन करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
मुलगा आणि सायकलचा किस्सा
त्यांनी आम्हाला पराभूत केलंय हे काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टिम दिवस रात्र हिंदुस्थानच्या नागरिकांच्या मनात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. असं का होत आहे? मी माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो. एक छोटा मुलगा सायकल घेऊन जातो. तो सायकलवरून पडतो आणि रडायला लागतो. तेव्हा एक मोठा माणूस म्हणतो, बघ पक्षी मेला, मुंगी मेली. तू चांगली सायकल चालवतो. तू पडला नाही. त्याचा धीर वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं ध्यान भरकटवण्याचं प्रयत्न करतो. आजही या लहान मुलांचं मन भरकटवण्याचं काम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस दहा वर्षात…
काँग्रेससाठी त्यांची इको सिस्टिम मन भरकटवण्याचं काम करत आहे. 1984ची निव़डणूक आठवा. त्यानंतर 10 लोकसभा निवडणुका झाल्या. या दहा निवडणुकांत काँग्रेस 250 चा आकडा गाठू शकली नाही. यावेळी कसे तरी 99 चा आकडा गाठलाय, असा चिमटाही त्यांनी काढला.
अराजकता निर्माण करणार होते
काँग्रेस देशात आर्थिक अराजक फैलवण्याच्या बेतात आहे. ज्या पद्धतीने ते आर्थिक पावलं उचलत आहेत, तो रास्ता देशाला आर्थिक अराजकतेकडे नेण्याचा आहे. त्यांच्या नेतृत्वातील राज्य देशावर आर्थिक बोझा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनासारखा निकाल आला नाही. 4 जून रोजी देशात आग लावली गेली असती. लोकं एकत्र करणार होते. त्यांना आगी लावून अराजकता निर्माण करायची होती. हा अराजकता निर्माण करणं यांचा हेतू आहे. त्यांचे राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांची इको सिस्टिम तयार होती. आजकाल सिंपथी गेन करण्याची नौटंकी सुरू झाली आहे. नवीन खेळ खेळला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.