मोदींनी आग्रह केला तरी अजितदादा उठले नाहीत, ‘महाराष्ट्राचा अपमान’ वाद चंद्रकांत पाटलांनी एका वाक्यात संपवला!
पुणेः पुण्यातील देहू येथील संत तुकाराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू दिलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. हा फक्त अजित पवारांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य केलं जात आहे. या आरोपाला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकाच […]
पुणेः पुण्यातील देहू येथील संत तुकाराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू दिलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. हा फक्त अजित पवारांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य केलं जात आहे. या आरोपाला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकाच वाक्यात विषय संपवला. ते म्हणाले, देहू येथील व्यासपीठावर आम्ही सगळेच होते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मी.. आदी मान्यवर होते. आम्ही सर्वांनीच पाहिलं की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही अजित पवार यांना भाषणासाठी उठा म्हटलं. पण अजित दादांनीच नकार दिला. टीव्ही कॅमेऱ्यांनी हा क्षण अनेकदा दाखवलाही. त्यामुळे अजित पवारांनी भाषण केलं नाही, यात महाराष्ट्राच अपमान झाला, असं काही नाही, असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलं.
काय घडलं नेमकं?
14 जून रोजी पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्ना झाला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित केल्या गेलं. मात्र मोदींनी आधी अजित पवार यांना भाषणासाठी उभे रहा, असं म्हटलं मात्र अजित पवारांनी नकार दिला. ही दृश्य अनेकांनी पाहिली. देहू येथील कार्यक्रमात पुण्याचे पालक मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी विनंती थेट पंतप्रधान कार्यालयाकडे कार्यक्रमाच्या आधीच करण्यात आली होती. मात्र दिल्लीतून पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं जे वेळापत्रक आलं, त्यात अजित पवारांना भाषणाची संधी देण्यात आली नव्हती, असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे मंचावर ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनंती करूनही अजित पवार उठले नाहीत. केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रात कार्यक्रम असतानाही महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू दिलं नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अजित पवार यांना प्रोटोकॉलनुसार भाषण करू द्यावे, एवढे भान पंतप्रधान आणि भाजपाला असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी संप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवून घेणार नाही. काहीही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना भाषण करण्याची संधी देऊन पक्षाचा प्रचार केला. हा संविधानिक पदाचा अपमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चूक दुरूस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.