नरेंद्र मोदी हुकूशाहीवर विश्वास ठेवतात? शहांनी सांगितलं, का असे सवाल केले जातात?
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मीडियाशी संवाद साधला. (PM Narendra Modi is a very good listener, dictatorship is false propaganda, says amit shah)
नवी दिल्ली: मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मीडियाशी संवाद साधला. अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मोदींच्या काळात घेतलेल्या कठिण निर्णयावरही भाष्य केलं. त्याची कारणमिमांसाही केली. एवढेच नव्हे तर देशाची कालच्या आणि आजच्या अवस्थेवरही बोट ठेवलं. जगभरात भारताची प्रतिमा खराब झालेली होती. मोदींनी देशाची प्रतिमा उजळवण्याचं काम केलं, असं शहा म्हणाले. तसेच मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात का?, असा सवाल केला असता मोदी सर्वांचं ऐकून घेतात आणि नंतरच निर्णय घेतात, असं थेट उत्तर अमित शहा यांनी दिलं.
अमित शहा यांनी संसदेच्या टीव्हीला प्रदीर्घ मुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. पंतप्रधान कुणाचेच ऐकत नाहीत का? एकटेच निर्णय घेतात का? मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात का? यात किती तथ्य आहे? असं अमित शहा यांना विचारलं असता, मी मोदींसारखा श्रोता आजवर पाहिलेला नाही. मी मोदींचं काम जवळून पाहिलं आहे. ते धैर्याने निर्णय गेतात. ते शेवटच्या व्यक्तीचंही म्हणणं ऐकून घेतात. एखाद्या व्यक्तीने सूचवलेली गोष्ट महत्त्वाची असेल तर त्याचा स्वीकारही करतात. तो मुद्दा कुणी मांडला हे महत्त्वाचं नसतं. तर तो मुद्दा किती महत्त्वाचा आहे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं, असं शहा म्हणाले.
मोदी निर्णय लादत नाहीत
मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आहेत. ते कोणत्याही बैठकीत अगदीच मोजके बोलतात. त्यानंतर सर्वांचं ऐकून ते निर्णय घेतात. कधी कधी तर एवढा काय विचार करायचा? एखाद्या विषयावर एवढी चर्चा कशाला करायची असं आम्हाला वाटतं. पण मोदी सर्वांचं ऐकून घेतात. छोट्या छोट्या विधानाचीही ते दखल घेतात आणि गुणवत्तेच्या आधारेच निर्णय घेतात. त्यामुळे मोदी निर्णय लादतात असं म्हणणं चुकीचं असून त्यात काहीच तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदी एकटेच निर्णय घेतात का?
मोदी हुकूमशहासारखे वागतात असं वातावरण का बनलं? यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जाणूनबुजून हे परसेप्शन तयार करण्यात आलं आहे. एखाद्या फोरममध्ये जी चर्चा होते. ती बाहेर येत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं मोदींनीच एकट्याने निर्णय घेतला. हा सामूहिक निर्णय असतो हे जनताच काय पत्रकारांनाही माहीत नसतं. आणि स्वाभाविकपणे निर्णय तेच घेऊ शकतात. कारण जनतेने त्यांना तसा अधिकार दिला आहे. मात्र, सर्वांशी चर्चा करून, त्यांना बोलण्याची संधी देऊन, सर्वांचे मायनस, प्लस पॉइंट बघून ते निर्णय घेतात, असंही त्यांनी सांगितलं.
काही लोक आमचे वैचारिक विरोधक आहेत. ते सत्या तोडूनमोडून सादर करतात. मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असा आरोपही त्यांनी केला.
सर्जिकल स्ट्राईक अमेरिकेची मक्तेदारी होती
मोदी धोका पत्करून महत्त्वाचे निर्णय घेतात. देशाला बदलण्यासाठी आपण सत्तेत आलो आहोत. सरकार चालवण्यासाठी सत्तेत आलेलो नाही, असं मोदी सांगत असतात. भारतातील जनतेला संपूर्ण जगाला सोबत घेऊन जायचं आहे. हेच आपलं एकमेव लक्ष्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी कुणीच सर्जिकल स्ट्राईकचा विचारही केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईक करणे ही केवळ अमेरिकेची मक्तेदारी असल्याचं मानलं जात होतं. मात्र, मोदींनी करून दाखवलं. नोटाबंदीचा निर्णयही कोणी घेऊ शकत नव्हतं. या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्थेत मोठा बदल झाला. त्याचप्रमाणे जीएसटीबाबतही आधी कुणाची हिंमत झाली नाही. तीन तलाकचा कायदा, कलम 370, पॅरीस करार, नवे शैक्षणिक धोरण, वन रँक वन पेन्शन आणि चीफ ऑफ डिफेन्स बनविण्याचा निर्णय. या सर्व गोष्टी मोदींचा निर्णय मोदींनी धाडसाने घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे सर्व निर्णय घ्यायला आधीची सरकारे घाबरत होती. मात्र, मोदींनी निर्भयपणे हे निर्णय घेतले. कारण त्यांचं लक्ष्य सरकार चालवणं नाही तर जनतेचा फायदा करणं हे होतं. त्यामुळेच ते हा निर्णय घेऊ शकले, असंही त्यांनी सांगितलं.
तीन कालखंड आव्हानात्मक
मोदींच्या सार्वजनिक आयुष्याचे तीन भाग केले जाऊ शकतात. एक म्हणजे भाजपमध्ये येण्याचा कालखंड. या काळात त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोठं योगदान दिलं. दुसरा कालखंड म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा. तर तिसरा म्हणजे राष्ट्रीय राजकारणात आल्यावर पंतप्रधान बनल्याचा. जेव्हा देशात भाजपच्या दोनच जागा आल्या होत्या. तेव्हा मोदी भाजपचे गुजरातमधील संघटन मंत्री होते. 1987मध्ये त्यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ते अहमदाबादच्या महापालिका निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी पहिल्यांदा पालिकेत भाजपची सत्ता आली. त्यामुळे हे तीन कालखंड अत्यंत महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले.
त्रिपुराची गुजरातशी तुलना करा
यावेळी शहांनी डाव्या पक्षांवरही टीका केली. गरीबांचा उद्धार करणं हे डाव्यांचं लक्ष्य कधीच नव्हतं. तर गरीबांच्या असंतोषाला फुंकर घालून त्याचा राजकीय लाभ उठवत सत्तेवर येण्याचं त्यांचं लक्ष्य होतं. बंगालमध्ये 27 वर्ष डाव्यांची सत्ता होती. आज बंगालची स्थिती पाहा. त्रिपुराची स्थिती पाहा. त्याची गुजरातशी तुलना करा, असंही त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 October 2021 https://t.co/wP02StmpDb #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021
संबंधित बातम्या:
कंटेन्मेंट झोनमध्ये सभांना परवानगी नाही, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांचा राजीनामा
(PM Narendra Modi is a very good listener, dictatorship is false propaganda, says amit shah)