‘पंतप्रधान मोदींच्या मनात आकस नाही, पण भाजपमधील ‘शुक्राचार्यांच्या’ राजकारणामुळे महाराष्ट्राच्या मदतीत अडथळे’
भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. | Sanjay Raut PM Modi
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. (Sanjay Raut slams Modi govt over Coronavirus situation in Maharashtra)
ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी संकटाच्या प्रसंगात महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे म्हटले. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्व आरोग्य सुविधा पुरवाव्यात. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे राऊत यांनी म्हटले. एक दिवस उद्योगधंदे बंद राहिले तरी चालतील पण लोकांचा जीव वाचला पाहिजे. आता भाजपशासित राज्यांमध्ये लॉकडाऊन लावावा, यासाठी उच्च न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागत आहे, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले ही खरी बाब आहे. पण मग न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सांगाव्यात. न्यायमूर्ती वेगाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करु शकतात का, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्यामुळे सध्या न्यायालयांनी सरकारच्या कारभारावर शेरे किंवा ताशेरे ओढू नयेत, असे संजय राऊत यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला.
‘बंगालच्या निवडणुकीत इतका पैसा खर्च केलात, मग महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी परत द्या’
गेल्या 24 तासांमध्ये देशात तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच यापेक्षा जास्त आहे.
केंद्र सरकार सर्व जबाबदारी आता राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. संबंधित बातम्या :
संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका
(Sanjay Raut slams Modi govt over Coronavirus situation in Maharashtra)