‘पंतप्रधान मोदींनी जे पेरलं तेच उगवलं’, पंजाबमधील घटनेवरुन नाना पटोलेंचा भाजपवर खोचक वार
वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, अशी टीका पटोले यांनी केलीय.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपला पंजाब दौरा रद्द (Punjab Tour Canceled) करावा लागल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भाजपच्या आरोपांना आता कांग्रेस नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ‘मोदींनी जे पेरलं तेच उगवलं’, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, अशी टीका पटोले यांनी केलीय.
2/3
चुनाव में हार सामने देख सहानुभूति लेने के लिए ये सब किया है।@CHARANJITCHANNI के इस्तीफे की नही @narendramodi के इस्तीफे की मांग होनी चाहिए।@INCIndia
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 5, 2022
‘सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपाकडून खटाटोप’
पटोले पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा असते, पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नियोजित कार्यक्रमामुसार ते हेलिकॉप्टरने सभेला जाणार होते. मात्र, अचानक त्यात बदल करून ते रस्ते मार्गाने निघाले. पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याची त्यांना जाणीव असेलच. मोदींच्या सभेला गर्दी जमली नाही त्यामुळे त्यांना सभा सद्द करावी लागली. पण खोटी माहिती पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी भाजपाकडून खटाटोप केला जात आहे.
‘काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजापचा हा केविलवाणा प्रयत्न’
सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा कांगावा करत पंजाबमधील काँग्रेस सरकारवर दोष देण्याचा भाजापाचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सुरक्षेचाच मुद्दा विचारात घेतला तर गांधी कुटुंबाच्या जिवीताला नेहमीच धोका राहिला आहे. या कुटुंबाने देशासाठी इंदिराजी व राजीवजींच्या रुपाने दोन बलिदान दिली आहेत. तरीही सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी जनतेत सामिल होतात, सुरक्षेची चिंता न करता सामान्य लोकांमध्ये मिसळतात. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुलजी गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. उत्तर प्रदेशातील पीडित कुटुंबाला भेटण्यास जाताना राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या सुरक्षेची काय परिस्थिती होती? प्रियंकाजी गांधी यांच्याशी पुरुष पोलिसांनी धक्कुक्की केली होती हे भाजपा विसरले काय? त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कोणी केली होती? कोणाच्या इशाऱ्यावर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवण्यात आले होते? याचे उत्तरही भाजपाने द्यावे, असं आव्हान पटोले यांनी भाजपला दिलंय.
इतर बातम्या :