मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात विविध पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी तब्बल 15 वर्षे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली आहेत. असं असताना त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
“मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं. पण विरोधक यशस्वी होऊ शकले नाहीत”, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर नाव न घेता काँग्रेसवर याबाबतची टीका केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत असताना काही लोक बँकेला लुटून पळाले, असंदेखील मोदी म्हणाले आहेत.
“भ्रष्टाचाराने आपल्या देशाचं खूप नुकसान केलं आहे. भ्रष्टाचाराने देशाला खूप सतावलं आहे. देशाची जनता पाहत आहे की, आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईच्या नावाने फक्त खानापुरी केली. हे तर ते लोकं ज्यांनी मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी काय-काय जाळं नाही टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी जनतेला आवाहन करताना परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदी निवडून आले. भाजप सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई करत गेल्या नऊ वर्षात 1 लाख 10 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, अशी माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंच काहीसं विधान केलं होतं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याल अटक करण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं होतं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. विशेष म्हणजे नुकतंच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची फसवणूक करुन धमकी देण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणातही मोठे नेते आणि अधिकाऱ्यांची नावे समोर येणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय.